चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत एकही आरोप नाही  : एकनाथ खडसे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

जळगाव : सार्वजनिक जीवनात गेल्या चाळीस वर्षांपासून कार्यरत असताना एकही आरोप झाला नाही. मात्र, दोन वर्षांपूर्वी निराधार, बेछूट आरोप करण्यात आले, ते केवळ बदनामीच्या उद्देशाने झाल्याचे यावरून दिसून येते, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या दोन वर्षांत आलेले अनुभव अत्यंत अस्वस्थ करणारे होते, असेही ते म्हणाले. 

जळगाव : सार्वजनिक जीवनात गेल्या चाळीस वर्षांपासून कार्यरत असताना एकही आरोप झाला नाही. मात्र, दोन वर्षांपूर्वी निराधार, बेछूट आरोप करण्यात आले, ते केवळ बदनामीच्या उद्देशाने झाल्याचे यावरून दिसून येते, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या दोन वर्षांत आलेले अनुभव अत्यंत अस्वस्थ करणारे होते, असेही ते म्हणाले. 
भोसरी जमीन खरेदी प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात सादर केलेल्या अंतिम अहवालात खडसेंना "क्‍लीन चीट' दिल्याचे वृत्त कळाल्यानंतर "सकाळ'ने संपर्क साधला असता त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. खडसे म्हणाले, गेल्या चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अशाप्रकारचे आरोप आपल्यावर कधीही झाले नाही. मात्र, 4 ते 21 मे 2016 दरम्यान दाऊदच्या पत्नीशी कथित संभाषण, स्वीय सहाय्यकाने लाच घेतल्याचे प्रकरण, जावयाच्या लिमोझीन कारचा आरोप आणि भोसरी जमीन खरेदीत गैरव्यवहार, असे अनेक आरोप सलगपणे विशिष्ट हेतूने करण्यात आले. केवळ आपली व कुटुंबाची बदनामी करण्यासाठी हे आरोप करण्यात आले होते. पुराव्याविना केलेल्या या प्रत्येक आरोपातून "क्‍लीन चीट' मिळाली. 

स्वत:हून दिला राजीनामा 
या आरोपांनंतर कोणत्याही विरोधकाने, राजकीय पक्षांनी आपल्या राजीनामा अथवा चौकशीची मागणी केली नव्हती. भोसरी जमीन खरेदी प्रकरणात आपण स्वत:हून राजीनामा देऊन चौकशीची मागणी केली. सुरवातीला आपल्याच मागणीनुसार निवृत्ती न्यायमूर्तींकडून व नंतर न्यायालयाच्या आदेशान्वये "एसीबी'कडून चौकशी झाली, त्यात आपण दोषी असल्याचे कुठेही सिद्ध झालेले नाही. त्यामुळे हा अहवाल माझ्यावर आरोप करणाऱ्या कथित समाजसेवकांसाठी मोठी चपराक आहे. अर्थात, हे प्रकरण अद्यापही न्यायप्रविष्ट असल्याने त्यात जास्त बोलणे उचित ठरणार नाही. 

अस्वस्थ करणारे अनुभव 
मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरचा काळ अत्यंत वाईट असल्याचे सांगत श्री. खडसे म्हणाले, कारण नसताना कुटुंबाची मानहानी झाल्याचे दु:ख खूप अस्वस्थ करणारे आहे. या दोन वर्षांत बरे-वाईट अनेक अनुभव आले. आपले व परके कोण, हेदेखील समजले. पण या काळात राज्यातील जनता आपल्यासोबत होती, त्यांच्या आशीर्वादानेच या अग्निदिव्यातून बाहेर येऊ शकलो, असे खडसे म्हणाले. 

निष्ठेमुळे पक्षनेतृत्व पाठीशी 
"एसीबी'च्या या अहवालानंतर मंत्रिमंडळातील प्रवेश सुकर झाल्याचे म्हणता येईल का, या मुद्यावर खडसे म्हणाले, चाळीस वर्षांपासून एका विचारातून निष्ठेने पक्षाचे काम केले. त्यावेळी केंद्रात व राज्यात आपले सरकार येईल, हा विचार नव्हता, त्यामुळे मंत्रिपदासाठी काम केले नाही. जनतेची सेवा पक्षाचे काम अविरतपणे करत राहिलो. या निष्ठेमुळेच पक्षनेतृत्व आजही आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे.

Web Title: marathi news jalgaon khadse interviwe