जिल्ह्यात "खरीप' कर्जवाटप तीन टक्केच! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

जळगाव : यंदा दुष्काळाची भीषणता तीव्र असताना मॉन्सूनही लांबणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकरी चिंतेत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आत्तापर्यंत केवळ दहा हजार शेतकऱ्यांना अवघे तीन टक्केच कर्जवाटप झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॅंकांची कर्जवाटपाबाबतची उदासीनता आणि कर्जमाफीच्या निर्णयाने जिल्हा बॅंकेकडील मोठी थकबाकी ही कारणे असल्याचे सांगितले जात आहे. 

यंदा संपूर्ण महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे. जळगाव जिल्हाही त्याला अपवाद नाही. शिवाय, यंदा मॉन्सूनही आठवडाभर उशिराने येणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. अशा स्थितीत दुष्काळामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने कर्जमाफी केली असली तरी पुढील पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांजवळ पैसा उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. कर्जमाफीमुळे जिल्हा बॅंकेची थकबाकी मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. मागील कर्ज वसूल न झाल्याने यंदा कर्ज वाटप अत्यंत कमी झाले आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने कर्ज दिले जात नसल्याने शेतकऱ्याची आर्थिक कोंडी झाली आहे. 

दहा हजार शेतकरीच पात्र 
जिल्ह्यात जिल्हा बॅंकेसह, राष्ट्रीयकृत, ग्रामीण आणि खासगी बॅंका मिळून 10 हजार 50 शेतकऱ्यांना आत्तापर्यंत केवळ तीन टक्केच कर्ज वाटप झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2936 कोटी रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट असताना फक्त आतापर्यंत केवळ 85 कोटी 6 लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. 
 
असे झाले कर्ज वाटप 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला यंदा 1247 कोटींचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, बॅंकेने आजवर 6 हजार 970 शेतकऱ्यांना केवळ 33 कोटी 2 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. तसेच राष्ट्रीयकृत बॅंकांना 1530कोटी 36 लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. पैकी या बॅंकांनी 2076 शेतकऱ्यांना केवळ 19 कोटी 94 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. ग्रामीण बॅंकांना 30 कोटी 92 लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. या बॅंकांनी 182 शेतकऱ्यांना अवघे 2 कोटी 22 लाख रुपये कर्जवाटप केले आहे. तर खासगी बॅंकांना 469 कोटी 27 लाखांचे उद्दिष्ट असताना या बॅंकांनी 1062 शेतकऱ्यांना 29 कोटी 88 लाख रुपये कर्ज वाटप केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon kharip hangam former loan