कोळशाचा तुटवडा अन्‌ नियमनाचा भार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

खानदेशच नव्हे तर राज्यात बहुतांश ठिकाणी यंदा पावसाळा चांगला झाला नाही. कुठे अतिवृष्टी तर कुठे पावसाने पाठ फिरविली. यामुळे जमिनीची भूक भागली नसून, गणेशोत्सवापासून गायब झालेल्या पावसाने पुन्हा फिरून देखील पाहिले नाही. यामुळे कमाल तापमानाने पस्तीशी गाठली असल्याने विजेची मागणी वाढली. मागणी वाढलेली असतानाच कोळशाचा देखील तुटवडा जाणवू लागला आणि "वीज'संकट उभे राहिले. "महावितरण'ने निश्‍चित केलेल्या सहा ग्रुपमधील "जी' ग्रुपमध्ये नऊ तासांपर्यंत भारनियमनास सुरवात झाली.

खानदेशच नव्हे तर राज्यात बहुतांश ठिकाणी यंदा पावसाळा चांगला झाला नाही. कुठे अतिवृष्टी तर कुठे पावसाने पाठ फिरविली. यामुळे जमिनीची भूक भागली नसून, गणेशोत्सवापासून गायब झालेल्या पावसाने पुन्हा फिरून देखील पाहिले नाही. यामुळे कमाल तापमानाने पस्तीशी गाठली असल्याने विजेची मागणी वाढली. मागणी वाढलेली असतानाच कोळशाचा देखील तुटवडा जाणवू लागला आणि "वीज'संकट उभे राहिले. "महावितरण'ने निश्‍चित केलेल्या सहा ग्रुपमधील "जी' ग्रुपमध्ये नऊ तासांपर्यंत भारनियमनास सुरवात झाली. अचानक सुरू झालेल्या भारनियमनाने उद्योग, व्यवसायांवर परिणाम तर झाला; शिवाय नागरिकांना दररोज रात्री किमान दहापर्यंत अंधारात राहावे लागतेय. 
 
वीज म्हणजे आज प्रत्येकाच्या जीवनातील एक अविभाज्य घटक झालेली आहे. वीजपुरवठा सुरू नसला, म्हणजे सर्व कामे खोळंबलेली राहतात. अशा स्थितीत भारनियमनाचा सामना करावा लागला म्हणजे नागरिकांसाठी हे अडचणीचे ठरत असते. मुळात विजेची मागणी अन्‌ पुरवठा यातील तफावतीमुळे "लाइन लॉस'चे प्रमाण वाढते. लाइन लॉस जेवढा अधिक तेवढे भारनियमनाचे प्रमाण जास्त असते. जिल्ह्यात विजेची होणारी मागणी आणि पुरवठा यात तफावत होत असल्याने 238 फिडर हे भारनियमनाच्या छायेत आहे. "महावितरण'च्या ढीम्म कारभारामुळे वीजग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 
 
"लाइन लॉस' वाढला 
उन्हाळ्याच्या दिवसांत एसी, पंखे, कुलर यांचा वापर अधिक होत असतो. शिवाय, कृषिपंपांचा वापरही वाढतो, त्यामुळे विजेची मागणी वाढत असते. हीच परिस्थिती "ऑक्‍टोबर हीट'मध्ये जाणवत असून, कृषीपंप मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. परिणामी फिडरवर अधिक भार येतो. शिवाय, अनेक ठिकाणी वीजचोरीही सुरूच असल्याने "लाइन लॉस'चे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यातील लाइन लॉसचे प्रमाण हे 40 टक्‍क्‍यांवर आहे. याशिवाय वीजबिलांची थकबाकी अधिक असल्याने "महावितरण'ला अजूनही भारनियमन करावे लागते. "महावितरण'तर्फे वीजगळती व वसुलीच्या प्रमाणात फिडरनिहाय भारनियमन करण्यात येत असून, सध्या स्थितीला "जी' ग्रुपमधील फिडरवर भारनियमन सुरू आहे. 
 
नियोजनाअभावी "खेळखंडोबा' 
"ऑक्‍टोबर हीट' सुरू झाल्यानंतर उकाड्यात होणारी वाढ आणि पिकांना पाणी देण्यासाठी सुरू होणाऱ्या मोटारींमुळे विजेची मागणी या दिवसांत वाढत असते. दरवर्षी हा प्रश्‍न निर्माण होत असून, कोळसा तुटवडा हे देखील "महावितरण'चे दरवर्षीचेच गाऱ्हाणे बनले आहे. वीजनिर्मिती केंद्रांना कोळशाची उपलब्धता कमी होत असल्याने राज्यात तात्पुरते भारनियमन सुरू करण्यात येते. राज्यातील विजेच्या मागणीतील ही तफावत तीन ते चार हजार मेगावॅटची झाल्यानंतर ग्रुप "जी'मधील फिडरवर भारनियमन सुरू करण्यात येते. त्यानुसार पंधरा दिवसांपासून "जी' ग्रुपमधील फिडरवर साडेआठ ते नऊ तासांचे भारनियमन केले जात आहे. मुळात ऑक्‍टोबरमध्ये कोळशाची समस्या जाणवत असताना त्याचे नियोजन "महानिर्मिती'कडून केले जात नसल्याने ऐनवेळी तात्पुरते भारनियमन केले जाते. 
 
238 फिडरवर भारनियमन 
जिल्ह्यात वीजपुरवठा करण्यासाठी 1 हजार 119 फिडर आहेत. यापैकी 238 फिडर "जी' ग्रुपमध्ये आहेत. या सर्व फिडरवर भारनियमन सुरू झाले आहे. "जी' ग्रुपमधील जी- 1 मध्ये 27, जी- 2 मध्ये 42 आणि जी- 3 मध्ये 169 फिडर येत आहेत. यामध्ये जळगाव शहरातील 16 फिडर आणि ग्रामीण भागातील 15 फिडरचा समावेश आहे. 

Web Title: marathi news jalgaon loadsheding G group