यंदाच्या "आखाजी'वर "लॉकडाउन'चे सावट 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 एप्रिल 2020

"आखाजी'च्या सणाला खानदेशात माहेरवाशिणी माहेरी येत असतात. मात्र, यंदा "कोरोना'च्या संकटामुळे "लॉकडाउन' असल्याने प्रवास करणे शक्‍य नाही, म्हणून महिलांच्या माहेरी जाण्याचे नियोजन यंदा बिघडले आहे.

जळगाव ः साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला व पूर्वजांचे स्मरण करण्याची शिकवण देणाऱ्या खानदेशातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेच्या सणावर अर्थात "आखाजी'वर यंदा मात्र "कोरोना'चे सावट आहे. "आखाजी'चा सण पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. यात पुरणपोळी, आंब्यांच्या रसाचे जेवण, पितरांच्या नावाने आगारी व घागर पूजना यास विशेष महत्त्व दिले जाते. परंतु "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या "लॉकडाउन'मुळे अनेकांचा रोजगार बुडाला असून "आखाजी'ची तयारी पाहिजे तशी बाजारात अद्याप दिसून आलेली नाही. 

क्‍लिक कराः ओली पार्टी' : रम', "रमी'त रंगली पोलिस- वाळूमाफियांची मैफल !

"कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी अर्थात "लॉकडाउन' सुरू असल्याने मार्चपासून असलेले सण-उत्सव अत्यंत साध्या पद्धतीनेसाजरे करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट ओढवलेले आहे. रोजगार ठप्प झाल्याने सणांची तयारी करण्यासाठी सर्वसामान्यांना आर्थिक अडचण जाणवते आहे. यंदा अक्षय तृतीयेचा सणही साजरा होणार होणार नसल्याने कुंभारबांधवांच्या घागर व्यवसायाला याचा फटका बसणार आहे. 

आर्वजून पहा : ऐंशीवर्षीय "तरुणा'ची ऊर्जादायी दिनचर्या; रोज 25 किलोमीटर सायकलिंग 
 

माहेरवाशिणी सासरीच! 
"आखाजी'च्या सणाला खानदेशात माहेरवाशिणी माहेरी येत असतात. मात्र, यंदा "कोरोना'च्या संकटामुळे "लॉकडाउन' असल्याने प्रवास करणे शक्‍य नाही, म्हणून महिलांच्या माहेरी जाण्याचे नियोजन यंदा बिघडले आहे. त्यांना सासरी राहूनच "आखाजी'चा सण साजरा करावा लागणार आहे. 

घागर विक्रीला परवानगी द्यावी 
कुंभार समाज अक्षय तृतीयेसाठी घागर तयार करून विक्री करतात. परंतु "लॉकडाउन'मुळे बाजारपेठा बंद असल्याने त्यांनी बनविलेल्या घागरी, पाण्याचे माठ, पक्ष्यांचे पाणी पिण्याचे पात्र तयार करून घरातच पडले आहेत. प्रशासनाने निदान दोन दिवस तरी त्यांना विक्रीसाठी परवानगी द्यायला हवी. कारण केवळ अक्षय तृतीयेलाच या घागर, माठ व पाण्याचे पात्र मोठ्या प्रमाणात विकले जातात. 

क्‍लिक कराः ओली पार्टी' : रम', "रमी'त रंगली पोलिस- वाळूमाफियांची मैफल !
 

आंब्यांच्या विक्रीवरही परिणाम 
अक्षय तृतीया अर्थात "आखाजी'साठी आंब्यांचा रसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे बाजारात आंबे खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. परंतु "कोरोना'च्या प्रादुर्भावामुळे "आखाजी'वरही सावट असल्यामुळे आंब्यांची आवक बऱ्यापैकी असूनही विक्री मात्र तुलनेत कमी प्रमाणात होताना दिसत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Lockdown on this year's Akhaji Festival