esakal | "लॉकडाउन'चा नंदुरबार, बऱ्हाणपूर पॅटर्न हवा जळगावात 
sakal

बोलून बातमी शोधा

"लॉकडाउन'चा नंदुरबार, बऱ्हाणपूर पॅटर्न हवा जळगावात 

खानदेशातील जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांत "कोरोना' संसर्गाची सुरवात साधारणत: एकाच वेळी झाली. परंतु नंदुरबारने "कोरोना बाधितां'चा आकडा 21 रुग्णांच्या पुढे जाऊ दिला नाही.

"लॉकडाउन'चा नंदुरबार, बऱ्हाणपूर पॅटर्न हवा जळगावात 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगावः दोन महिन्यांपासून देशव्यापी "लॉकडाउन' सुरू असूनही "कोरोना'चा संसर्ग वाढत असून, आता चौथ्या "लॉकडाउन'ची अंमलबजावणी कठोरपणे होण्याची गरज निर्माण झाली आहे. महिनाभरापूर्वी "ग्रीन झोन' असलेला जळगाव जिल्हा बाधित रुग्णसंख्येत तीनशेपर्यंत पोहोचला असून, प्रशासनाच्या ढिलाईमुळे ही स्थिती ओढवल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे जळगावातही आता "लॉकडाउन'चा बऱ्हाणपूर व नंदुरबार पॅटर्न राबविण्याची गरज आहे. जीवनाश्‍यक वस्तू, अत्यावश्‍यक सेवेसाठी विशिष्ट दिवस व वेळ ठरवून गर्दी टाळता येऊ शकते, त्यादृष्टीने विचार व्हावा. 


"कोरोना' संसर्गाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात तर त्याने हाहाकार माजवला आहे. जळगाव जिल्हाही त्याला अपवाद नाही. मात्र, जळगाव जिल्ह्यात महिनाभरापूर्वी जे चित्र होते, "लॉकडाउन'च्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात ते भीषण बनले. प्रशासन, पोलिस दल व महापालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे दिसून येते. त्यामुळे आता किमान चौथ्या टप्प्यातील "लॉकडाउन' गांभीर्याने पाळण्याची गरज आहे. 

कठोर उपायांची आवश्‍यकता 
"कोरोना' संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळी राज्ये त्या-त्या परीने प्रयत्नशील आहेत. काही ठिकाणी तर जिल्हा प्रशासनांनी कठोर उपाययोजना करून संसर्ग रोखण्यात यश मिळविले आहे. राजस्थानातील "भिलवाडा पॅटर्न' त्यामुळे देशात प्रसिद्ध झाला, तर केरळनेही "कोरोना'ला सक्षमपणे रोखून धरले. जळगाव जिल्ह्यालगतच मध्य प्रदेशातही "कोरोना'ने हाहाकार उडालेला असताना या राज्यातील काही गावांमध्ये प्रभावी उपाययोजना करण्यात येऊन संसर्गाला आळा घालण्यात आला. जिल्ह्यालगत असलेल्या बऱ्हाणपूरमध्ये (मध्य प्रदेश) "कोरोना' संसर्गाचा उद्रेक सुरू आहे. कालपर्यंत या ठिकाणी 197 रुग्ण आढळून आले. परंतु बऱ्हाणपूरच्या स्थानिक प्रशासनाने "लॉकडाउन'चे काटेकोरपणे पालन करणे सुरू केले. बऱ्हाणपूर प्रशासनाचे उपाय जळगावातही राबविण्याची गरज आहे. 


बऱ्हाणपूरमधील उपाय 
- दूधविक्री सकाळी व सायंकाळी प्रत्येकी दोन तास 
- भाजीपाला, फळविक्रीचे ठेले, स्टॉल पूर्ण बंद 
- किराणा बुकिंगनुसार घरपोच सुविधा 
- नियमांचे उल्लंघन केल्यास थेट गुन्हा 
- औषधींची दुकाने सकाळी व दुपारी प्रत्येकी चार तास 

नंदुरबारचा आदर्श घेण्यासारखा 
खानदेशातील जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांत "कोरोना' संसर्गाची सुरवात साधारणत: एकाच वेळी झाली. परंतु नंदुरबारने "कोरोना बाधितां'चा आकडा 21 रुग्णांच्या पुढे जाऊ दिला नाही. दोघांचा बळी गेल्यानंतर उर्वरित सर्व 19 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे काल हा जिल्हा "कोरोना'मुक्त झाला. 

नंदुरबारमध्ये या केल्या उपाययोजना 
- बाधित रुग्णांच्या संपर्कातील सर्वांना "ट्रेस' केले 
- सर्वांची तातडीने तपासणी केली 
- बाधित रुग्णांच्या परिसरात कंटेन्मेंट झोनची कठोर अंमलबजावणी 
- बाहेरून येणाऱ्यांना क्वारंटाइन करण्याची प्रभावी योजना 
- पोलिस यंत्रणेने ठेवला चोख बंदोबस्त