महामार्ग चौपदरीकरण वर्षभरात करण्याचे "टार्गेट' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

जळगाव : जिल्ह्याच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या बनलेल्या महामार्ग चौपदरीकरणाचे मोठे "टास्क' वर्षभरात पूर्ण करण्याचे आव्हान महामार्ग प्राधिकरण अर्थात "न्हाई'ने स्वीकारले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील फागणे ते तरसोद व तरसोद- चिखली या दोन्ही टप्प्यातील कामांची गती वाढविण्यावर "न्हाई'चा भर असून महिनाभरात या दोन्ही टप्प्यांवर प्रत्यक्ष रस्त्याचे बांधकाम सुरू होईल, असे सांगितले जात आहे. 

जळगाव : जिल्ह्याच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या बनलेल्या महामार्ग चौपदरीकरणाचे मोठे "टास्क' वर्षभरात पूर्ण करण्याचे आव्हान महामार्ग प्राधिकरण अर्थात "न्हाई'ने स्वीकारले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील फागणे ते तरसोद व तरसोद- चिखली या दोन्ही टप्प्यातील कामांची गती वाढविण्यावर "न्हाई'चा भर असून महिनाभरात या दोन्ही टप्प्यांवर प्रत्यक्ष रस्त्याचे बांधकाम सुरू होईल, असे सांगितले जात आहे. 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील नवापूर ते अमरावती या जवळपास साडेतीनशे किलोमीटर टप्प्याच्या चौपदरीकरणातील जळगाव जिल्ह्यातील फागणे ते तरसोद व तरसोद ते चिखली टप्प्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. अनेक वर्षांपासून हे काम रखडल्याने आता सुरु झाल्यानंतर ते वेळेत किंबहुना वेळेच्या आधीच पूर्ण करण्यासाठी "न्हाई'चे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. 

स्वतंत्र अधिकाऱ्याद्वारे देखरेख 
या प्रयत्नांचाच भाग म्हणून "न्हाई'ने जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी स्वतंत्र प्रकल्प संचालकाची नियुक्ती केली आहे. चंद्रकांत सिन्हा यांनी नुकताच या पदाचा कार्यभार स्वीकारला असून त्यांच्या माध्यमातून या कामावर देखरेख, दैनंदिन कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला जात आहे. 

वर्षभरात पूर्णत्वाचे उद्दिष्ट 
या दोन्ही टप्प्यांमध्ये फागणे- तरसोद टप्प्याचे काम एमबीएल कन्स्ट्रक्‍शनला तर तरसोद-चिखली टप्प्यातील काम वेल्स्पन कंपनीला देण्यात आले आहे. फागणे- तरसोदच्या तुलनेत तरसोद ते चिखली या टप्प्यातील काम उशिरा सुरू झाले, मात्र वेल्स्पनने हे काम वर्षभरात पूर्ण करण्याचे आव्हान स्वीकारले आहे. त्यादृष्टीने मक्तेदार कंपनीचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. दरम्यानच्या काळात निधीच्या उपलब्धतेअभावी फागणे- तरसोद टप्प्याचे काम संथ झाले होते, मात्र पुन्हा या कामास गती मिळाली आहे. 
 
खासदारांमध्ये स्पर्धा 
लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक पुढील वर्षी एप्रिल महिन्यात होऊ घातली आहे. गेल्या पाच वर्षांत दाखविता येईल, असे एकही काम जिल्ह्यात झालेले दिसत नाही. त्यामुळे नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या बनलेल्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करून त्या आधारे निवडणुकीला सामोरे जावे असा भाजपचा कल आहे. त्यासाठी ही दोन्ही टप्प्यातील कामे ए.टी. पाटील व रक्षा खडसे या दोन्ही खासदारांच्या कार्यक्षेत्रातील असल्याने कुणाचे काम लवकर पूर्णत्वाकडे जाते, त्यासाठी दोहोंत स्पर्धा लागल्याचीही बोलले जात आहे. विकासकामांसाठीही ही स्पर्धा नागरिकांसाठी लाभदायक ठरेल, असे दिसते. 
 

Web Title: marathi news jalgaon mahamarg target