शाळांमध्ये ना निकाल...ना ध्ववजारोहण 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 May 2020

महाराष्ट्र दिन अर्थात 1 मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झाली. हे हिरक महोत्सवी वर्ष आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी शाळा, महाविद्यालयामध्ये ध्वजरोहण समारंभ आयोजित केला जातो. यावर्षी मात्र कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गर्दी केल्यास त्यातून संसर्ग वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

शेंदुर्णी (ता. जामनेर) ः शाळांच्या परीक्षा संपून सर्व विद्यार्थी घरी किंवा मामाच्या गावाला गेलेले असतात. पण, महाराष्ट्र दिन आला की त्या दिवशी ध्वजारोहण समारोह झाल्यानंतर सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांचे निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना निकालपत्र दिले जाते. यंदा मात्र शाळांमध्ये ना निकाल लागला ना ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. सारा शालेय परिसर शांत शांत होता. 

हेपण वाचा - जळगावात आणखी चार पॉझिटीव्ह रूग्ण 

महाराष्ट्र दिन अर्थात 1 मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झाली. हे हिरक महोत्सवी वर्ष आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी शाळा, महाविद्यालयामध्ये ध्वजरोहण समारंभ आयोजित केला जातो. यावर्षी मात्र कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गर्दी केल्यास त्यातून संसर्ग वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे यंदा शाळेमध्ये ध्वजवंदन करण्यात येऊ नये असे आदेश शासनामार्फत देण्यात आले होते. म्हणूनच शाळांमध्ये ना ध्वजावंदन..ना निकाल अशी परीस्थिती शाळांमध्ये प्रथमच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी दिसून आली. 

महाराष्ट्र दिनी शाळांमध्ये शांतता 
जुन महिन्यात सुरू होणारे शैक्षणिक सत्र दरवर्षी साधारणपणे 14 एप्रिलपर्यंत परीक्षा संपून पुर्ण झालेले असते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा मार्च महिन्यातच बंद करण्यात आल्या मुलांना परिक्षा न होताच सुट्या लागल्या. परीक्षा झाल्यानंतर 1 मेच्या दिवशी शाळेमध्ये ध्वजावंदनासाठी तसेच निकाल पत्रक घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात. ध्वजवंदन झाल्यानंतर मुलांना निकाल पत्रक वाटप केले जाते. आपल्या मित्र मैत्रिणी किती गुण मिळाले; कोणती श्रेणी मिळाली अशी चर्चा शाळेमध्ये दिसुन येत असते. शाळेकडूनही चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्याचे कौतुक केले जाते. काही पालक पेढे वाटून आपल्या मुलांना प्रोत्साहन देत असतात. मात्र यावर्षी शाळेमध्ये हे चित्र पहावयास मिळाले नाही. 

निकालाची प्रतिक्षा 
शाळांचे निकाल 1 मेस जाहीर झाले नसले तरी लवकरच निकालाची प्रतिक्षा संपणार असून शासनाकडून निकालाची तारीख जाहीर करण्यात येणार असली, पण महाराष्ट्र दिनाचा मुहर्त हुकला तो हुकचाल. तरीपण शिवरायांचा लढवय्या महाराष्ट्राचा इतिहास पाहता कोरोना सारख्या संकटावर आपण नक्कीच मात करू. कधीही हार न मानणारा महाराष्ट्र दुष्काळ, भुकंप, अतिवृष्टी, महापूर अशा अनेक संकटांना सामोरे जाऊन नव्या दमाने पुन्हा उभा राहिला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon maharashtra days no school result declear