अघोषित भारनियमन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

जळगाव : विजेची मागणी व पुरवठा यांच्यात यंदा यशस्वीपणे सांगड घालण्यात आली असली, तरी विविध कारणांमुळे बहुतांश भागांत वेळी- अवेळी व वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. "महावितरण'ने मॉन्सूनपूर्व कामांचे कारण पुढे केले असले, तरी सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने उन्हाच्या तीव्रतेत अंगाची काहिली आणि उकाड्याने नागरिक हैराण होत आहेत; तर ग्रामीण भागात यापेक्षाही विदारक स्थिती असून, पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. दरम्यान, शनिवारी (2 जून) जळगाव शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले.

जळगाव : विजेची मागणी व पुरवठा यांच्यात यंदा यशस्वीपणे सांगड घालण्यात आली असली, तरी विविध कारणांमुळे बहुतांश भागांत वेळी- अवेळी व वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. "महावितरण'ने मॉन्सूनपूर्व कामांचे कारण पुढे केले असले, तरी सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने उन्हाच्या तीव्रतेत अंगाची काहिली आणि उकाड्याने नागरिक हैराण होत आहेत; तर ग्रामीण भागात यापेक्षाही विदारक स्थिती असून, पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. दरम्यान, शनिवारी (2 जून) जळगाव शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले. त्यामुळे "महावितरण'च्या वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेची अक्षरश: दाणादाण उडाली. या पहिल्याच वळवाच्या पावसाने यंत्रणेच्या मर्यादा उघड झाल्या. जिल्ह्यातील जवळपास सर्वच भागांत वीजपुरवठा खंडित होऊन तो सुरळीत व्हायला चार-पाच तासांचा अवधी लागला... 
 

उन्हाळ्यात जळगाव जिल्ह्यातील तापमानाच्या पाऱ्याने विक्रमी आकडा गाठला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान 44- 45 अंश सेल्सिअसच्या खाली आलेले नाही. उलट गेल्या आठवड्यात तापमानाने पुन्हा पंचेचाळिशी पार केली. अशा स्थितीत अंगाची काहिली होत असताना जळगाव शहरासह परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार अधिक वाढले आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात विजेची मागणी आणि पुरवठा यात तफावत होत असल्याने भारनियमन होत असते. यंदा मात्र ही परिस्थिती नसून, मागणीइतकाच पुरवठा करण्यात आल्याने भारनियमन झालेले नाही; परंतु वारंवार आणि अधिक वेळपर्यंत वीजपुरवठा खंडित राहत असल्याने "भारनियमन' की "अघोषित भारनियमन' याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. 
 
मॉन्सूनपूर्व कामांचे कारण 
गेल्या महिनाभरापासून "महावितरण'कडून जळगाव शहरासह जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व कामे हाती घेण्यात आली. त्यात वीजतारांमध्ये येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडणे, ट्रान्स्फॉर्मर, फ्यूज बदलणे, खांबावरील तुटलेल्या तारा जोडणे, लोंबकळलेल्या तारा बदलविणे यांसारखी कामे सुरू असून, त्यामुळे त्या- त्या भागात वीजपुरवठा खंडित केला जातो. या कामांचे कोणत्याही प्रकारचे वेळापत्रक करण्यात आलेले नाही. काम कुठे व किती वेळ करायचे, ते ऐनवेळी ठरविण्यात येते. त्यामुळे अवेळी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहे. उन्हाळा असल्याने दुपारी अथवा रात्री काही भागांत अतिरिक्त भार येत असल्याने बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होत असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
रात्रीही वीजपुरवठा खंडित 
दिवसभर वेळी- अवेळी खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यास मॉन्सूनपूर्व कामांचे कारण "महावितरण'कडून पुढे केले जात आहे. सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत काम केले जात असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण समजू शकते; परंतु रात्री कोणत्याही वेळात वीजप्रवाह खंडित होण्याचे प्रकारदेखील गेल्या आठवड्यापासून वाढले आहेत. याला कोण जबाबदार म्हणावे? म्हणजेच "महावितरण'कडून एकप्रकारे "अघोषित भारनियमन'च सुरू झाल्याचे म्हणावे लागणार आहे. शहरातील काही भागांत रोज नियमित वेळेतच वीजपुरवठा खंडित होत आहे. 
 
आणखी आठ दिवसांचे काम 
"महावितरण'कडून महिनाभरापासून सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व कामे 80 टक्‍के झाली आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी उर्वरित कामे पूर्ण करण्याचे नियोजन असून, किमान आठ- दहा दिवसांत कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे "महावितरण'कडून सांगण्यात आले. अर्थात, गेल्या महिनाभरात हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे आता पावसाने दिवस सुरू झाल्यानंतर कामे कशी काय होतील, याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. 

पहिल्याच पावसात दाणादाण 
दरम्यान, शनिवारी (2 जून) जळगाव शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह वळवाच्या पावसाने हजेरी लावली. नियमित मॉन्सून 6- 7 जूननंतर येण्याचे संकेत असताना, या मॉन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला झोडपून काढल्याने त्यात वीज यंत्रणाही पार कोलमडून गेली. शनिवारी झालेल्या वादळी पावसात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, फांद्या तुटल्या. त्यामुळे वीजतारा तुटून "महावितरण'ची यंत्रणा ठप्प झाली. जिल्ह्यातील अनेक भागांत शनिवारी रात्रीपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. थोडेही वादळ आले, तरी वीज गुल होते, हा अनुभव शनिवारीही आला. जिल्ह्यात काही भागांत रविवारीही वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. 

जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व कामे हाती घेण्यात आली असून, एलटी आणि एचटी वाहिनीवरील दुरुस्तीची कामे सुरू आहेत. शिवाय, ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती व वीजतारांना ताण देण्याचे काम करण्यात येत आहे. मॉन्सूनपूर्व दुरुस्तीची कामे सुरू असल्याने या काळात "ब्रेक डाउन' करण्यात येत आहे. जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व दुरुस्तीची 80 टक्‍के कामे झाली आहेत. 

- शिवाजी भालशंकर, कार्यकारी अभियंता (प्रशासन), जळगाव मंडळ, महावितरण 
 

Web Title: marathi news jalgaon mahavitran loadsheding