"त्या' पंचांनी पंधरा हजार घेऊन केला "जातगंगा' विधी 

mansi bagde
mansi bagde

जळगाव, : कंजरवाड्यातील मानसी ऊर्फ मुस्कान बागडे या तरुणीने आजोबा व जातपंचायतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना 23 जानेवारीला घडली. कंजारभाट जातपंचायतीने जिवंतपणी मानसीला व तिच्या परिवाराला जातीत घेतले नाही. मात्र मृत्युपश्‍चात 15 हजार घेऊन "जातगंगा' विधी करून जातीरिवाजा नुसार अंत्यविधीला परवानगी दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने, पंचायतीच्या पदाधिकारी सदस्यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यात संशयितांच्या अटकेसाठी तीन पथके तयार करण्यात आली आहे. 

बानोबाई व आनंद दिनकर बागडे यांच्या प्रेम विवाहानंतर सासरे दिनकर श्रावण बागडे याने सून म्हणून स्वीकारण्यास व जातीत समाविष्ट करण्यास तीव्र विरोध केला व मुलाचे जातीत दुसरे लग्न लावून दिले. वीस वर्षाच्या विरोधानंतरही बानोबाई दोन मुलींसह कंजरवाड्यात स्थायिक होती. मुलगी मानसी ऊर्फ मुस्कान हिचे कोल्हापूर येथील प्राध्यापक मुलाशी लग्न ठरल्यावर सासरे दिनकर बागडे व जातपंचायतीने विरोध केला व जातीत घेण्यास नकार दिला होता. अखेर पिडीतेने आत्महत्या केल्यानंतर तिचे कंजारभाट स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यासाठी अडवणूक करण्यात आली. जिवंतपणी लग्नाला विरोध व मृत्युपश्‍चात पोलिसांत तक्रार होवुनये म्हणून पीडित कुटुंबाला दहशतीत घेण्यात आले. लग्नलाविरोध करणारा आजोबा दिनकर बागडेला अटक होऊन पीडितेच्या आईचा पुरवणी जबाब नोंदवून जात पंचायतीविरुद्ध सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक अधिनियम-2016 अन्वये गुन्हा दाखल झाला. तत्पूर्वीच संपूर्ण पंचायतीचे सदस्य जळगाव सोडून फरार झाले आहेत. दाखल गुन्ह्यात संशयिताच्या अटकेसाठी पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या आदेशाने विशेष तीन पथके गठित करण्यात आले असून फरार पंचाचा शोध सुरू असल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक नवटके यांनी सांगितले. 

कंजरवाड्यात कॉर्नर बैठकीत गोंधळ 
पोलिस निरीक्षक रणजित शिरसाठ यांनी आज कंजरवाड्यातील रहिवाश्‍यांसोबत दुपारी 3 वाजता चर्चेसाठी कॉर्नर बैठक घेतली. बैठकीत उपस्थितांना घडलेल्या घटनेबाबत आणि दाखल गुन्ह्यातील अनिवार्यतेबाबत मार्गदर्शन करताना नंदुरबार येथील कथित मानवाधिकार कार्यकर्ता बंटी नेतलेकर याने शिरसाठ यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून बैठकीतच गोंधळ घातला. निरीक्षक शिरसाठ यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, मुदस्सर काझी, इम्रान शेख आदी कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतल्यावर उपस्थित समाज बांधवांच्या आग्रहावरून या तरुणावर प्रतिबंधक कारवाई करून समज देऊन सोडण्यात आले. मात्र, कंजरवाड्यात या प्रकरणामुळे एकच गोंधळ उडला होता. 

मानसीच्या पश्‍चात कुटुंबीय दहशतीखाली 
कंजारभाट समाजाच्या जात पंचायतीने पीडित व मृत मानसी बागडे आत्महत्याप्रकरणी तक्रारदार त्यांच्या आई बानोबाई आनंद बागडे यांच्या परिवाराला जात पंचायतीच्या पंच व संबंधितांकडून निर्माण दहशत निर्माण झाली आहे. झालेल्या दहशतीमुळे व जीवितास संभाव्य धोक्‍यासाठी पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांचेकडे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जळगाव यांनी शनिवारी निवेदनाद्वारे केली आहे. 
जात पंचायतीशी संबंधित नातेवाईक, समाजातील इतर मोठे धेंड बानोबाईला सतत दहशतीखाली घेण्याचा प्रयत्न करीत असून त्यातूनच किरकोळ वादाच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. परिणामी हे कुटुंब भेदरलेल्या अवस्थेत असून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. शिवाय तक्रार माघारी घेण्यासाठी दबाव आणला जात आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत बानोबाईच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण मिळावे यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आज जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देताना जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी. एस. कट्यारे, ऍड. भरत गुजर, विश्‍वजित चौधरी, अश्‍पाक पिंजारी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com