मनसे फॅक्‍टरचा आम्हालाच फायदा -गिरीश महाजन 

मनसे फॅक्‍टरचा आम्हालाच फायदा -गिरीश महाजन 

जळगाव ः मनसे फॅक्‍टर अर्थातच राज ठाकरे यांच्या सभांमुळे भाजपा-शिवसेनेला मोठा फटका बसेल, असा कयास बांधला जात असतानाच मनसेचा युतीला तोटा होण्याऐवजी फायदाच झाला, असे प्रतिपादन जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केले. अप्रत्यक्षरित्या मनसेला सोबत घेण्याची चूक कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या अंगलट आल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. 

राज ठाकरे यांनी ज्या-ज्या शहरांत सभा घेऊन भाजपाचे शीर्ष नेतृत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेलक्‍या शब्दांत टीका केली, त्यांना आता जनतेनेच धडा शिकविला आहे. राज यांच्या सगळ्या सभा म्हणजे निव्वळ करमणुकीचे कार्यक्रम ठरले. मते मिळविण्यासाठी केवळ भाषणे देऊन चालत नाही, त्यासाठी ग्राऊंडवर काम करावे लागते, असेही महाजन यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणतात, मनसेच्या धाडसाचे कौतुकच करायला हवे. मात्र लोकांनीच मनसेला उघड पाडले. मनसेचेच व्हीडिओ पाहण्याची वेळ आता आली आहे. यापुढे तरी अशा गोष्टी करण्यापूर्वी विधानसभेत आपली एखाद-दुसरी जागा कशी येईल, याचा विचार मनसेने करावा, असा सल्लाही महाजन यांनी दिला. स्थानिक स्वराज्य संस्था असो वा अन्य कुठल्याही संस्था, एकही सदस्य कुठेच नसताना आपल्याला मोठे समजण्याची चूक मनसेने केली, मात्र त्यांना जनतेने जागा दाखविली असा टोलाही त्यांनी लगावला. 

लोकांसाठी देश महत्त्वाचा 
विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना जनतेने काहीही किंमत दिलेली नसल्याचे निकालावरुन स्पष्ट झाल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. लोकांना देश आणि देशाची सुरक्षा सर्वाधिक महत्त्वाची वाटत असल्यानेच नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वावर व्यक्त केलेला हा विश्वास असल्याचेही ते म्हणाले. वंचित फॅक्‍टरचा फायदा झाला का, या प्रश्नावर मोदी फॅक्‍टर हा सर्व फॅक्‍टरपेक्षा मोठा असल्याचे त्यांनी म्हटले. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचे लोकांनी ठरवून टाकलेले होते, त्यामुळे त्या व्यतिरीक्त अन्य कोणताही फॅक्‍टर मोठा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

विधानसभेत पुन्हा भाजपाच 
केंद्रातील ऐतिहासिक विजयाचा येत्या विधानसभा निवडणुकीवर निश्‍चित परिणाम होईल. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वावर राज्यातील जनता खूष आहे. विकासाची कामे जनता जाणून आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी 50 जागांपेक्षा जास्त जागा जिंकणार नाही, असे भाकीतही गिरीश महाजन यांनी केले. 

जादूगार गिरीश महाजन 
ज्या गिरीश महाजनांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक म्हणून पाहिले जाते, आपत्कालीन परिस्थितीत ते त्या भूमिकेत जातातच तथापि, उत्तर महाराष्ट्रातील चाणक्‍य म्हणूनही ते उदयास आले. त्यात आता विजयांच्या सलग मालिकेमुळे गिरीश महाजन यांना जादूगार म्हणूनही संबोधित केले जाऊ लागले आहे.2014 च्या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्राची भाजपाची सगळी सूत्रे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे होती. तेव्हाही भाजपाने या सगळ्या जागा जिंकल्या होत्या. यंदा मात्र गेल्या काही काळापासून भाजपाविरोधाची सुप्त लाट दिसत होती. पण या विरोधी लाटेचा कोणताही प्रभाव न जाणवता उत्तर महाराष्ट्रातील सगळ्या जागा जिंकून गिरीश महाजनांनी आपण या संपूर्ण परिसरावर जादू केल्याचे जणू सिद्ध केले. जळगावचे उन्मेष पाटील यांनी चार लाखांवर मताधिक्‍य घेत राज्यातील सर्वांत मोठा विजय गिरीष महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली मिळविला, हा देखील एक रेकॉर्ड आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com