"मार्च एंडिंग' : "मनपा'त एकाच दिवशी 31 लाखांचा भरणा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

जळगाव ः एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्याने आज "मार्च एंडिंगला (31 मार्च) व्यवहारांचे ताळेबंद केले जातात. त्या अनुषंगाने आज "मार्च एंडिंग'ला एकाच दिवशी नागरिकांनी 31 लाख रुपयांचा महापालिकेत भरणा केला. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महापालिकेच्या मालमत्ता करवसुलीत वाढ झाल्याची माहिती वसुली विभाग अधीक्षक सोनवणी यांनी दिली. 

जळगाव ः एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्याने आज "मार्च एंडिंगला (31 मार्च) व्यवहारांचे ताळेबंद केले जातात. त्या अनुषंगाने आज "मार्च एंडिंग'ला एकाच दिवशी नागरिकांनी 31 लाख रुपयांचा महापालिकेत भरणा केला. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महापालिकेच्या मालमत्ता करवसुलीत वाढ झाल्याची माहिती वसुली विभाग अधीक्षक सोनवणी यांनी दिली. 
महापालिका प्रशासकडून वसूल केल्या जाणाऱ्या मालमत्ता कराची नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. ती वसुलीसाठी महापालिका प्रशासनाकडून वसुली पथक तयार केले आहे. उद्यापासून (1 एप्रिल) नवीन आर्थिक वर्षाला सुरवात होणार असल्याने महापालिकेत आज चारही प्रभाग समित्यांचे कार्यालय सुरू होते. नेहमीप्रमाणे आज चारही प्रभाग समित्यांसह महापालिकेत वसुली विभाग सकाळी नऊपासून सायंकाळी सहापर्यंत सुरू होता. मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी नागरिकांनी सकाळपासून महापालिकेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान, आज "मार्च एंडिंग'ला नागरिकांकडून 31 लाख 72 हजार रुपयांची वसुली करण्यात आली. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत वसुलीत तीन कोटींनी वाढ 
महापालिका प्रशासनाकडून गेल्या वर्षी 42 कोटी 21 लाख 54 हजार 480 रुपये होती. यंदा महापलिकेच्या वसुली विभागाने वर्षभर मोहीम राबविल्यामुळे यंदा मार्चअखेर आजपर्यंत 45 कोटी 15 लाख 11 हजार 618 रुपये झाली. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वसुलीत सुमारे तीन कोटी रुपये वाढ झाल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. 

मतदान प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांची धावपळ 
लोकसभा निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना मतदान प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. महापालिका कर्मचारीही या प्रशिक्षणाला उपस्थित राहणे आवश्‍यक होते. परंतु आज मार्चअखेर असल्याने कर्मचाऱ्यांना वसुलीची कामे करावी लागल्याने त्यांची धावपळ झाली. 

प्रभागनिहाय आजची वसुली 
"मार्च एंडिंग'ला "मनपा'च्या वसुली विभागातर्फे चारही प्रभागांत मालमत्ता कराची वसुली करण्यात आली. यात प्रभाग क्र. 1 मध्ये 15 लाख 18 हजार 382 रुपये, प्रभाग क्र. 2 मध्ये 7 लाख 93 हजार 542 रुपये, प्रभाग क्र. 3 मध्ये 3 लाख 86 हजार 291 रुपये, तर प्रभाग क्र. 4 मध्ये 4 लाख 74 हजार 668 रुपयांची वसुली करण्यात आली. यात सर्वाधिक वसुली प्रभाग क्रमांक 1 मधून झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 

Web Title: marathi news jalgaon march ending muncipal corporation 31 lakh bill submitade