कचराकोंडी....महापौरांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 मार्च 2020

महापौरांनी शहर स्वच्छतेसाठी पर्यायी महापालिकेच्या माध्यमातून यंत्रणा उभी केली होती. त्यात मंगळवारी पुन्हा सर्व कर्मचाऱ्यांना कामावर बोलावून "वॉटरग्रेस'चा प्रतिनिधी स्वत:च गायब झाल्याचा प्रकार घडला.

जळगाव : शहरातील दैनंदिन स्वच्छता व कचरा संकलनाचा मक्ता महापालिकेने वॉटरग्रेस कंपनीला दिला आहे. परंतु एक महिन्यापासून मक्तेदाराने काम बंद केल्याने शहरात जागोजागी कचरा साचला होता. तीन दिवसांपूर्वी महापौरांनी शहर स्वच्छतेसाठी पर्यायी महापालिकेच्या माध्यमातून यंत्रणा उभी केली होती. त्यात मंगळवारी पुन्हा सर्व कर्मचाऱ्यांना कामावर बोलावून "वॉटरग्रेस'चा प्रतिनिधी स्वत:च गायब झाल्याचा प्रकार घडला. महापौरांसह भाजप, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी टीबी रुग्णालयाच्या जागवेर मंगळवारी पहाटे अचानक दिलेल्या भेटीत हा प्रकार लक्षात येताच त्यांनी लागलीच शहर स्वच्छतेसाठी पुन्हा सर्व वाहनांना रवाना केले. दरम्यान, यावेळी मक्तेदाराची बाजू घेणाऱ्या उपायुक्तांची चांगलीच कानउघाडणी यावेळी महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी केली. 

कर्मचाऱ्यांना मेसेज पाठवून बोलावले 
शहर स्वच्छतेसाठी महापालिकेची पर्यायी यंत्रणा मोडून काढण्यासाठी सोमवारी रात्री उशिरा "वॉटरग्रेस'कडून कर्मचाऱ्यांना व्हॉटसऍपवर मेसेज पाठवून मंगळवारी सकाळी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. पहाटेपासून कर्मचारी येऊन थांबलेले असताना देखील वॉटरग्रेसचा एकही प्रतिनिधी टीबी रुग्णालय परिसरात उपस्थित नव्हता. त्यात वॉटरग्रेसच्या आश्वासनामुळे महापालिका उपायुक्त व आरोग्याधिकारी यांनी वॉटरग्रेसला सहकार्य करण्याच्या सूचना आरोग्य व वाहन निरीक्षकांना दिल्याने कोणतेही वाहन शहर स्वच्छतेसाठी बाहेर पडलेले नव्हते. 

महापौरांचा शहर स्वच्छतेसाठी संताप 
टीबी सनेटोरियमला महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती ऍड. शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, नवनाथ दारकुंडे, नितीन बरडे यांनी अचानक भेट दिली. वॉटरग्रेसने कर्मचाऱ्यांना बोलाविले आणि त्यांचा प्रतिनिधीच नसल्याने सर्व वाहने थांबून असल्याची बाब समोर आली. महापौर भारती सोनवणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता रात्री वॉटरग्रेसकडून मेसेज आल्याने उपायुक्त यांनी तशा सूचना दिल्या असल्याचे समजले. शहरात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना देखील मनपा अधिकारी वॉटरग्रेसला सूट देत असल्याने महापौर चांगल्याच संतापल्या. त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना खडसावले. 

वाहनचालकांची महापौरांनी काढली समजूत 
महापालिका अधिकारी "वॉटरग्रेस'ची बाजू घेत असल्याचे पाहताच वाहनचालकांचा पारा वाढला. अगोदरचे वेतन न देणाऱ्या वॉटरग्रेसवर विश्वास ठेवला तर पुढील पगाराची शाश्वती तुम्ही घेणार का असा प्रश्न कामगारांनी उपस्थित केला. वॉटरग्रेस पुन्हा वाहनांचा ताबा घेणार असेल तर थकीत वेतन मिळाल्याशिवाय काम करणार नाही असा पवित्रा कामगारांनी घेतला होता. महापौर भारती सोनवणे यांनी त्यांची समजूत काढत वॉटरग्रेससाठी न काम करता महापालिकेसाठी करा, असे सांगितल्यावर सर्व कर्मचारी शहर स्वच्छतेसाठी रवाना झाले. 

कायदेशीर बाबी तपासणार 
दरम्यान, दुपारी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, स्थायी सभापती ऍड. शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेत वॉटरग्रेसच्या तक्रारींचा पाढा वाचत स्वच्छतेचा मक्‍त्ता रद्द करण्याची मागणी केली. दरम्यान, महापालिकेतील अधिकाऱ्यांचे वॉटरग्रेससोबत साटेलोटे असल्याचा आरोपही यावेळी केला. पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत मक्ता देताना करण्यात आलेल्या अटी-शर्तींचा अभ्यास करून कायदेशीर बाजू तपासून वॉरटग्रेसबाबत पुढील कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी पदाधिकाऱ्यांना दिले. मात्र, वाटरग्रेसचा मक्ता रद्दच करावा, या मागणीवर पदाधिकारी ठाम होते. 

राष्ट्रवादीने दिले निवेदन 
अस्वच्छतेच्या प्रश्‍नावरून आज राष्ट्रवादीतर्फे आयुक्त सतीश कुलकर्णी यांना माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली आज देण्यात आले. निवेदनात शहरात कोरोना आजार पसरू नये, यासाठी शहरातील अस्वच्छतेचा प्रश्‍न त्वरित मार्गी लावण्याचा मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

शहरातील अस्वच्छतेचा प्रश्‍नाबाबत उपायुक्त तसेच आरोग्याधिकारी, कर्मचाऱ्यांशी चर्चा केली 
आहे. त्यामुळे तीन दिवसांत साचलेला कचरा आधी उचलण्याचे आम्ही नियोजन केले आहे. त्यानुसार 
काम सुरू आहे. 
 सतीश कुलकर्णी, आयुक्त, महापालिका 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon The Mayor's Official Delegation