Loksabha 2019 : मेगा रिचार्जचे लवकरच भूमिपूजन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

"मेगा रिचार्ज' हा आशिया खंडातील सर्वांत मोठा प्रकल्प होणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मी स्वतः व एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. या प्रकल्पामुळे रावेर, यावल, चोपडा या भागातील शेती सुजलाम्‌ सुफलाम्‌ होईल आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. आमच्या सरकारने यासाठी साडेसहा हजार कोटींचा डीपीआर मंजूर केला आहे. लवकरच त्याचे भूमिपूजन होऊन "मेगा रिचार्ज'चे स्वप्न पूर्ण होईल, असा दावा रावेरचे आमदार हरिभाऊ जावळे यांनी केला. 

"मेगा रिचार्ज' हा आशिया खंडातील सर्वांत मोठा प्रकल्प होणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मी स्वतः व एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. या प्रकल्पामुळे रावेर, यावल, चोपडा या भागातील शेती सुजलाम्‌ सुफलाम्‌ होईल आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. आमच्या सरकारने यासाठी साडेसहा हजार कोटींचा डीपीआर मंजूर केला आहे. लवकरच त्याचे भूमिपूजन होऊन "मेगा रिचार्ज'चे स्वप्न पूर्ण होईल, असा दावा रावेरचे आमदार हरिभाऊ जावळे यांनी केला. 

प्रश्न ः महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्यासाठी कुठल्या आधारावर मते मागणार? 
आमदार जावळे ः गेल्या पाच वर्षांत रक्षाताई यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रत्येक गावा-गावांत जाऊन जनतेच्या शक्‍य त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात रस्ते, रेल्वे पूल यासह अनेक कामे त्यांनी केली. त्याच विकासकामांच्या जोरावर आम्ही मते मागणार आहे. यावल- रावेर तालुका प्रथमच दुष्काळी घोषित झाला आहे. शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, म्हणून विधानसभेत मी आणि आमदार खडसेंनी आवाज उठवून हे तालुके दुष्काळ यादीत टाकायला सांगितले. 

प्रश्न ः आपण सात वर्षे खासदार असताना आपल्या मतदारसंघात राहिलेली कामे मार्गी लागली का? 
आमदार जावळे ः बऱ्हाणपूर- अंकलेश्वर राज्य राष्ट्रीय महामार्ग झाला पाहिजे तसेच रेल्वे ओव्हर ब्रिज, मेगा रिचार्ज यासाठी मी खासदार असताना प्रयत्न केले होते. खासदार रक्षा खडसे यांनी या प्रकल्पांचा लोकसभेत सतत पाठपुरावा करून ते मार्गी लावले आहेत. एक महिला खासदार म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. 

प्रश्न ः केळीला फळाचा दर्जा कधी मिळणार? 
आमदार जावळे ः केळीला फळाचा दर्जा मिळावा, यासाठी अनेक वर्षांपासून मागणी होती. आमचे सरकार आल्यानंतर कृषी विभागाने केळीला फळाचा दर्जा दिला आहे. केळीची आपल्या भागातून अनेक देशांत चांगल्या प्रकारे निर्यात होत आहे. 

प्रश्न ः शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही किंवा पीकविमा मिळत नाही, अशी ओरड आहे. त्यावर काय म्हणाल? 

आमदार जावळे ः शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही, ही शेतकऱ्यांची ओरड नसून हे विरोधकांचे म्हणणे आहे. आमचे सरकार आल्यानंतर नाथाभाऊ कृषिमंत्री असताना सर्वांत आधी आम्ही 46 अंशांची अट आम्ही 44 अंश तापमानावर आणली. शेतकऱ्यांना आमच्या सरकारकडून प्रत्येक पिकावर नुकसान भरपाई मिळत आहे, ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. राज्य सरकारने जी कर्जमाफी केली, ती ऐतिहासिक आहे. त्यामुळे शेतकरी हे आनंदी व समाधानी आहेत. 

प्रश्न ः केंद्र व राज्य सरकारच्या भविष्यातील योजना काय असतील? 
आमदार जावळे ः आगामी काळात मतदारसंघात आमचे विकासकामे करण्याचे मोठे ध्येय आहे. यात सोलरपासून वीज निर्मिती, शेतकऱ्यांसाठी पिकते तिथे प्रक्रिया उपलब्ध करून देणे, केळी खोडापासून गॅस व अल्कोहोल तयार करणे यासाठी संशोधन सुरू आहे. कृषी प्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रथम आमच्या सरकारचा मानस आहे. आमच्या या कृषिपूरक आणि विकासाच्या धोरणांमुळे खासदार रक्षा खडसे यांना मतदार पुन्हा संसदेत पाठवतील, यात माझ्या मनात अजिबात शंका नाही. 
 

Web Title: marathi news jalgaon mega richarge haribhavu javade