भावी डॉक्‍टर मीलनवर "आर्या'चे छत्र 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

जळगाव ः आईचा शिवणकाम व ब्युटी पार्लरचा व्यवसाय, वडील वेळेनुसार छोटीमोठी कामे करून संसाराचा रहाटगाडा ओढतात आणि या कुटुंबातील विजिगिषू वृत्तीचा मुलगा डॉक्‍टर होण्याच्या जिद्दीने "नीट' परीक्षेत घवघवीत यश मिळवतो. पण, पुन्हा प्रवेशासाठी अडथळा शिक्षणशुल्काचा... हा अडथळा पार करण्यासाठी त्याच्यावर शहरातील आर्या फाउंडेशनने छत्र धरले अन्‌ त्याला वैद्यकीय शिक्षणासाठी पूर्ण पाच वर्षांसाठी फाउंडेशनने दत्तक घेतले. फाउंडेशनच्या या आशादायक निर्णयाने गरीब कुटुंबातील एक मुलगा पाच वर्षांनी समाजाच्या वैद्यकीय सेवेसाठी तत्पर होणार आहे. मीलन घनश्‍याम पोपटाणी असे या गुणवान विद्यार्थ्याचे नाव..! 

गेल्या वर्षी मीलन हा बारावी सायन्समध्ये जिल्ह्यातून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. परंतु, "नीट' परीक्षेत त्याला कमी गुण मिळाले, तेव्हा हार न मानता मीलनने या वर्षी पुन्हा "नीट' परीक्षा देऊन 556 गुण मिळवत आपल्या वैद्यकीय सेवेच्या स्वप्नांची ज्योत पेटविली. मात्र, हलाखीच्या स्थितीमुळे "एमबीबीएस' प्रथम वर्षासाठी लागणारी 78 हजारांची शासकीय फी भरणेही अवघड बनले. नंतर या कुटुंबाने डॉ. अनुप येवले यांच्या माध्यमातून आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला अन्‌ आर्या फाउंडेशन त्याच्या मदतीला धावले. 

डॉ. पाटील शहरातील अन्य डॉक्‍टरांशी संपर्क करून मदतीसाठी विनंती केली. या सर्वांच्या मदतीने शिक्षणशुल्काचा निधी पाहता पाहता जमा झाला आणि मीलनच्या वैद्यकीय शिक्षणाची चिंताच मिटली. पुढील पाचही वर्षे आर्या फाउंडेशनतर्फे त्याला दत्तक घेण्यात आले असून, त्याचा संपूर्ण खर्च फाउंडेशन करणार आहे. 

हुशार आणि होतकरू विद्यार्थी केवळ पैशांअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये व अशा विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन संस्थेचं हे कार्य इतर गरजू विद्यार्थ्यांसाठी करावं, हाच या मदतीमागचा उद्देश आहे. 
- डॉ. धर्मेंद्र पाटील, अध्यक्ष, आर्या फाउंडेशन, जळगाव

Web Title: marathi news jalgaon milan aarya