मोदींच्या नेतृत्वासह खडसेंच्या प्रभावावर शिक्कामोर्तब 

मोदींच्या नेतृत्वासह खडसेंच्या प्रभावावर शिक्कामोर्तब 

आघाडीच्या जागावाटपातील घोळ, ऐनवेळी कॉंग्रेसला सुटलेली जागा या घोळामुळे रावेर मतदारसंघात भाजपचे मताधिक्‍य वाढण्यास मदत झाली. अर्थात, ही स्थिती उद्‌भवली नसती, तरीही रक्षा खडसेंनी घेतलेले मताधिक्‍य बघता, रावेर मतदारसंघाने पुन्हा एकदा माजी मंत्री एकनाथराव खडसेंचे प्रभुत्व, मोदींचे नेतृत्व आणि भाजपचे वर्चस्व सिद्ध केल्याचे दिसते. 2014 च्या तुलनेत रक्षा खडसेंचे मताधिक्‍य काहीसे घटले असले, तरी मतदारसंघातील एकूणच चित्र बघता कॉंग्रेसला आत्मचिंतन करायला लावणारा हा निकाल आहे... 


मतदान झाल्यानंतरच्या टप्प्यात खानदेशातील, किंबहुना संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील आठपैकी रावेर या एकमेव जागेवर भाजपच्या विजयाबाबत ठामपणे सांगितले जात होते. आज प्रत्यक्ष निकालावेळी अपेक्षेप्रमाणे या जागेवर भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी तब्बल तीन लाखांवर मताधिक्‍य घेऊन विजय मिळविला. भाजपमधील "वजनदार नेते' म्हणून उल्लेख होत असलेल्या एकनाथराव खडसेंचा या संपूर्ण मतदारसंघावर प्रभाव असल्याचे सांगितले जाते. त्यांचा शब्द प्रमाण, अशी या मतदारसंघातील गेल्या तीस वर्षांपासूनची स्थिती. 2014 च्या निवडणुकीसारखी यावेळी स्थिती नव्हती, ही वस्तुस्थिती असली, तरी भाजप उमेदवारांच्या विजयाबद्दल अगदी विरोधकही खात्री देताना दिसून आले. 

आघाडीचा घोळ अन्‌ धावपळ 
दुसरीकडे, आघाडीच्या जागावाटपात कॉंग्रेसने सुरवातीपासूनच या जागेसाठी आग्रह धरला असला, तरी "राष्ट्रवादी'कडून त्याला प्रतिसाद मिळालाच नाही. मंत्रिमंडळातून बाहेर असलेले खडसे भाजप नेतृत्वावर नाराज होते. त्यामुळे "राष्ट्रवादी'ला खडसेंच्या भूमिकेची प्रतीक्षा होती. खडसे "राष्ट्रवादी'च्या वाटेला गेले नाहीत, तिथून "राष्ट्रवादी'तर्फे उमेदवाराचा शोध सुरू झाला व लगेच संपलाही. म्हणून "राष्ट्रवादी'ने ही जागा कॉंग्रेसला दिली. कॉंग्रेसनेही मग कार्यकर्त्यांत ऐनवेळी ऊर्जा भरत माजी खासदार असलेल्या डॉ. उल्हास पाटलांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ घातली. 

भाजपचे निर्विवाद वर्चस्व 
डॉ. पाटलांना प्रचारासाठी फारसा वेळ मिळाला नाही, असे कारण कदाचित पुढे केले जाईल. मात्र, मतमोजणी सुरू झाली, तेव्हापासून भाजप उमेदवार रक्षा खडसेंनी घेतलेली आघाडी बघता कॉंग्रेसने सक्षमपणे लढतही दिली नाही, असेच चित्र होते. मोदींचे नेतृत्व, खडसेंचा प्रभाव आणि खासदार म्हणूनही रक्षा खडसेंची कामगिरी या तिन्ही बाबींचा सकारात्मक परिणाम म्हणून 2014 सारखी लाट नसतानाही खडसेंना या ठिकाणी मोठे मताधिक्‍य मिळू शकले आणि भाजपने केळीपट्ट्यात पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. 


सर्वच मतदारसंघांत आघाडी 
लोकसभेच्या रावेर मतदारसंघाच्या चोपडा, भुसावळ, रावेर, जामनेर, मुक्ताईनगर आणि मलकापूर, अशा सर्व सहा विधानसभा क्षेत्रातून रक्षा खडसेंना मोठे मताधिक्‍य मिळाले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नितीन कांडेलकर यांचा निकालावर परिणाम करेल, एवढा प्रभावही जाणवला नाही. तरीही कांडेलकर यांनी घेतलेल्या सुमारे 90 हजार मतांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 
वस्तुत: या मतदारसंघात मराठा व लेवा समाजाचे अनुक्रमे प्राबल्य आहे. कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी या दोन्ही समाजांची मोट बांधण्यात अयशस्वी ठरली. तुलनेने केवळ मराठा, लेवाच नव्हे; तर अन्य समाजानेही भाजपला मोदींच्या नावावर, खडसेंच्या शब्दावर मतदान केल्याचे दिसते. एकूणच निवडणुकीचा परिणाम बघता, भाजपचा उत्साह वाढविणारा व कॉंग्रेससह "राष्ट्रवादी'लाही आत्मचिंतन करायला लावणारा आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com