पत्नीच्या जाचास कंटाळून पतीने आई-वडिलांसह सोडले घर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

जळगाव : पत्नीच्या जाचाला कंटाळून श्रीधर नगरातील 36 वर्षीय तरुण वृद्ध आई-वडिलांसह घर सोडून निघून गेला आहे. घर सोडण्यापूर्वी घरातील डायरीवर पत्नी रुपालीसाठी, "तुझ्या इच्छे प्रमाणे आम्ही हे, जग सोडून जात असल्याचे' नमूद करण्यात आले असून विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलिसांत पतीसह सासू, सासरे बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

जळगाव : पत्नीच्या जाचाला कंटाळून श्रीधर नगरातील 36 वर्षीय तरुण वृद्ध आई-वडिलांसह घर सोडून निघून गेला आहे. घर सोडण्यापूर्वी घरातील डायरीवर पत्नी रुपालीसाठी, "तुझ्या इच्छे प्रमाणे आम्ही हे, जग सोडून जात असल्याचे' नमूद करण्यात आले असून विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलिसांत पतीसह सासू, सासरे बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

रामानंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहिता रूपाली सोनगिरे (वय 28) रा. श्रीधर नगर, पॉवर हाउस जवळ या पती दीपक (36), सासू रजनी (55), सासरे आत्माराम (वय 60) असे एकत्र वास्तव्यास आहेत. राहत्या घरातच ब्युटी पार्लरचे काम करून त्या कुटुंबाला हातभार लावतात. दीपक एमआयडीसीत खासगी कंपनीत कामाला आहे. रूपालीच्या मावस बहिणीचे मंगळवारी (ता. 14) धरणगाव येथे लग्न असल्याने ती दोन दिवसांपूर्वीच (12 मे) दुपारी पिंप्राळा येथील मावशीच्या घरी गेली, नंतर 13 मे रोजी दीपकने संध्याकाळी हळदीच्या कार्यक्रमाला परस्पर येईल असे सांगितले. रूपाली कपडे वगैरे घेऊन पिंप्राळा येथून धरणगावला पोचली. जाताना घरी सासू व सासरे हे एकटेच होते. रात्री हळदीला आले नाही, लग्नालाही येतात की, नाही म्हणून रूपाली दीपकला वारंवार फोन करत होती, मात्र त्यांचा मोबाईल बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. सासऱ्यांचाही मोबाईल बंद होता. लग्न लागेपर्यंत नवरा आलाच नाही, फोनही लागत नाही. विपरीत काही घडले तर नाही म्हणून रुपालीने तिच्या वडिलांना सोबत घेत जळगाव गाठले. घरालाही कुलूप लागले असल्याने त्यांनी घर उघडून बघितल्यावर आत डायरीवर "सुसाईड नोट' प्रमाणे पेन्सिलीने चिठ्ठी लिहिलेली होती. ती वाचून त्यांना धक्‍काच बसला. तातडीने त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाणे गाठले. विवाहितेच्या खबरीवरून रामानंद पोलिसांत पती, सासू आणि सासरे हरविल्याची नोंद करण्यात आली. याबाबत पुढील तपास विजय निकुंभ करीत आहे. 
 
काय होते डायरीत? 
घर उघडताच घरात डायरी उघड्या स्थितीत ठेवलेली दिसली त्यातील एका पानावर पेन्सिलने, "प्रिय रूपालीस, तुझ्या इच्छेप्रमाणे मी आणि माझे आई-वडील हे जग सोडून जात आहोत. तुझी इच्छा पूर्ण होवो ही सदिच्छा तुझा आणि फक्त तुझाच दीपक, कृपया आमचा तपास करू नकोस. आम्ही मेलो, तुला सोडून', असे लिहिले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon mother father house