मुक्ताईनगरात "राष्ट्रवादी'तर्फे ऍड रवींद्र पाटील उमेदवार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

जळगाव : मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऍड. रवींद्र पाटील यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मतदार संघात सर्व्हेक्षण करून याबाबत निर्णय कळविण्याचे आदेश दिले आहेत. 

जळगाव : मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऍड. रवींद्र पाटील यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मतदार संघात सर्व्हेक्षण करून याबाबत निर्णय कळविण्याचे आदेश दिले आहेत. 

मुक्ताईनगर मतदार संघात भारतीय जनता पक्षातर्फे एकनाथराव खडसे यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे तयारी सुरू करण्यात आली आहे. पक्षातर्फे माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद तराळ, रमेश नागराज पाटील, सागर पाटील, डॉ. उद्धव पाटील, पवनराजे पाटील हे इच्छुक उमेदवार होते. त्यांच्या नावाची चर्चाही सुरू होती. मात्र या इच्छुकांनी नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. यातील विनोद तराळ, रमेश पाटील, सागर पाटील तसेच ईश्‍वर रहाणे, यु. डी. पाटील, राजेश वानखेडे, दीपक पाटील यांनी मुंबई पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांची भेट घेऊन ऍड. रवींद्र पाटील यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली होती. 
त्यांच्या मागणीनंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांना तातडीने मुंबई येथे पाचारण केले होते. त्यानुसार आज ऍड. पाटील यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली, त्यांच्या सोबत मुंबईत गेलेले मुक्ताईनगरातील इच्छुक उमेदवार व कार्यकर्तेही होते. याबाबत माहिती देताना जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांनी सांगितले, की इच्छुक उमेदवारांनी आपले नाव सुचविल्याचे सांगण्यात आले, परंतु आपण उमेदवारी मागितली नसल्याचेही सांगितले. त्यावर शरद पवार यांनी आदेश दिला, की आपल्या उमेदवारी बाबत किंवा दुसऱ्या उमेदवाराबाबत मतदार संघात सर्व्हेक्षण करा, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून दोन ते तीन दिवसात निर्णय कळवा. त्यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व इच्छुक उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते मतदार संघात फिरून चर्चा करून निर्णय कळविणार आहोत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon muktainagar rashtrawadi candidate ravindra patil