अभियंत्यांनी घरी बसून केली मतदारयादी!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

जळगाव ः महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रसिद्ध प्रारूप मतदारयादीत मोठ्या प्रमाणात घोळ असून, सुमारे पाच ते सहा हजार नावे अन्य प्रभागांमध्ये गेली आहेत; तर महापालिका अभियंत्यांनी घरात बसून याद्या तयार केल्याने हा घोळ झाला झाल्याचा आरोप सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान, सदस्यांनी आज याबाबत उपायुक्त चंद्रकांत खोसे यांना घेराव घालत जाब विचारला. 

जळगाव ः महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रसिद्ध प्रारूप मतदारयादीत मोठ्या प्रमाणात घोळ असून, सुमारे पाच ते सहा हजार नावे अन्य प्रभागांमध्ये गेली आहेत; तर महापालिका अभियंत्यांनी घरात बसून याद्या तयार केल्याने हा घोळ झाला झाल्याचा आरोप सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान, सदस्यांनी आज याबाबत उपायुक्त चंद्रकांत खोसे यांना घेराव घालत जाब विचारला. 
आज दुपारी शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख कुलभूषण पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नीलेश पाटील, माजी नगरसेवक चंद्रकांत कापसे, जाकीर पठाण, भाजपचे सागर पाटील, राजीव मोरे, विजय पाटील, रवींद्र कोळी, शक्ती महाजन, संतोष पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिकांनी उपायुक्त खोसे यांच्याकडे यादीतील घोळाबाबत नाराजी व्यक्त केली. 
 
अभियंत्यांवर कारवाई करा 
यावेळी चंद्रकांत कापसे, कुलभूषण पाटील उपायुक्तांकडे तक्रार करताना म्हणाले, की प्रकाश पाटील, अमृतकर, परदेशी या अभियंत्यांनी घरी बसून याद्यांचे काम केले आहे. प्रत्यक्षात प्रभागात जाऊन, सीमारचना अभ्यासून हे काम झालेले नाही. त्यामुळे त्यात मोठा घोळ असून, या अभियंत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. 
 
नगरसेविकेचे नाव दुसऱ्या प्रभागात 
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका मुक्तारबी रसूल पठाण यांचा रहिवास प्रभाग 10 मध्ये आहे; तर प्रारूप मतदारयादीत आता हे नाव प्रभाग 9 मध्ये टाकण्यात आले आहे; याचप्रमाणे हुडकोमधील तीन हजार मतदारांची नावेदेखील प्रभाग 9 मध्ये गेल्याची तक्रार करण्यात आली. प्रभाग 8 मधील एक हजार मतदारांची नावे प्रभाग 7 मध्ये टाकल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नीलेश पाटील यांनी केला आहे. 
 
हरकती दाखल करा 
सर्वपक्षीयांनी केलेल्या तक्रारीवर उपायुक्त खोसे म्हणाले, की मतदारयाद्या प्रारूप स्वरूपाच्या असून, त्यावर हरकती दाखल करा. यामध्ये बदल होऊ शकतो. मात्र, हरकती दाखल करून फारसा उपयोग होणार नसल्याचे सांगत पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाच्या या कामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. 
 
उपोषणाचा इशारा 
मतदारयादीत झालेल्या घोळावर तोडगा काढा. तोडगा न काढल्यास महापालिकेसमोर सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकारी व नागरिकदेखील उपोषण करतील, असा इशारा यावेळी उपायुक्त खोसे यांना दिला. 
 
हरकतींची घरोघरी जाऊन पडताळणी 
प्रारूप मतदारयाद्यांवर 14 जूनपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यानुसार आज दुसऱ्या दिवशी 15 हरकती महापालिका प्रशासनास प्राप्त झाल्या आहेत. आलेल्या हरकतींवर त्यातील तक्रारीचे स्वरूप पाहून महापालिका अभियंते व प्रभाग अधिकारी घरोघरी जाऊन पडताळणी करतील. 
 

Web Title: marathi news jalgaon muncipal corporation election list