शहरात उभारणार 17 महिला स्वच्छतागृहे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 मार्च 2020

शहरात दहा दिवसांपूर्वी एक महिला उघड्यावर लघुशंकेसाठी बसल्याने तिला पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. घटनेची माहिती कळताच निधी फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांच्याकडून महापौर व स्थायी समिती सभापतींना याबाबत उपाययोजना करण्याची विनंती केली होती.

जळगाव : शहरात महिला स्वच्छतागृहांची संख्या कमी असल्याने महिलांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे महिलांची होणारी कुचंबणा थांबविण्यासाठी महापालिकेकडून शहरात लवकरच 17 ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. तोवर महिलांना शहरातील हॉटेल्स, पेट्रोलपंपांचे स्वच्छतागृह वापरण्यास द्यावे, असे आवाहन महापौर, स्थायी समिती सभापती व महिला, बालकल्याण सभापती यांनी केले. यास सर्व हॉटेल व पेट्रोलपंप मालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 

हेही पहा - "कोरोना'चा प्रभाव..ठराविक औषधांच्या किमती दुप्पट

शहरात दहा दिवसांपूर्वी एक महिला उघड्यावर लघुशंकेसाठी बसल्याने तिला पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. घटनेची माहिती कळताच निधी फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांच्याकडून महापौर व स्थायी समिती सभापतींना याबाबत उपाययोजना करण्याची विनंती केली होती. त्यावर आज महापालिकेत महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती ऍड. शुचिता हाडा, महिला व बालकल्याण सभापती शोभा बारी यांनी हॉटेल्स, पेट्रोलपंप मालक आणि डॉक्‍टरांची बैठक आयोजित केली होती. 
बैठकीला नगरसेवक कैलास सोनवणे, अतुलसिंग हाडा, मनोज काळे, डॉ. दीपक पाटील, डॉ. जितेंद्र कोल्हे, डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. सारिका पाटील, निधी फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते, पेट्रोलपंपमालक लक्ष्मीकांत चौधरी, प्रकाश चौबे, कुशल गांधी, रामेश्वर जाखेटे, हॉटेल असोसिएशनचे ललित पाटील, विजय चौधरी, राजेंद्र पिंपळकर, अनिल कावनी आदी उपस्थित होते. यावेळी स्थायी समिती सभापती ऍड. हाडा यांनी आपापल्या आस्थापनेतील स्वच्छतागृह महिलांसाठी खुले करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. तसेच महापालिका लवकरच शहरात 17 ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह उभारणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

पेट्रोलपंप, हॉटेल्स मालक सकात्मक 
शहरातील सर्व पेट्रोलपंपांच्या दर्शनी भागावर ठळकपणे स्वच्छतागृह उल्लेख करण्याचे आश्वासन पेट्रोलपंप चालकांनी दिले. तसेच स्वच्छतागृहांचा उपयोग करण्यास कोणत्याही महिलेला रोखले जाणार नाही, यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना देऊ असेही त्यांनी सांगितले. शहरातील केवळ जेवणाची सोय असलेल्या हॉटेलमधील स्वच्छतागृह महिलांसाठी वापरू देण्याचेही हॉटेल्स मालकांनी सकारात्मकता दर्शवली. 

स्वच्छतागृह उभारणीसाठी करणार मदत 
जळगाव शहरात महिलांची होणारी अडचण लक्षात घेता महिला स्वच्छतागृह उभारण्यास डॉक्‍टर असोसिएशनकडून सर्वातोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन बैठकीत डॉक्‍टरांनी दिले. तसेच हॉटेल्स असोसिएशनने देखील आश्वासन दिले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon muncipal corporation ladies toilet in city