थकबाकी भरण्याचा सोमवारपर्यंत "अल्टिमेटम' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

जळगाव ः महापालिकेच्या व्यापारी संकुलांतील मुदत संपलेल्या गाळेधारकांच्या प्रतिनिधींची आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी आज 
बैठक घेतली. त्यात आयुक्तांनी गाळेधारकांना 24 डिसेंबरपर्यंत थकीत गाळेभाडे भरण्याची मुदत दिली. या मुदतीत पैसे न भरल्यास 26 डिसेंबरनंतर कारवाई होईल, असा इशारा दिला. 

जळगाव ः महापालिकेच्या व्यापारी संकुलांतील मुदत संपलेल्या गाळेधारकांच्या प्रतिनिधींची आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी आज 
बैठक घेतली. त्यात आयुक्तांनी गाळेधारकांना 24 डिसेंबरपर्यंत थकीत गाळेभाडे भरण्याची मुदत दिली. या मुदतीत पैसे न भरल्यास 26 डिसेंबरनंतर कारवाई होईल, असा इशारा दिला. 
महापालिकेच्या 18 व्यापारी संकुलांतील गाळ्यांची मुदत 2012 ला संपली. तेव्हापासून आजपर्यंत गाळेधारकांकडे भाडे थकीत आहे. थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाने मे 2018 पर्यंतचे गाळेभाडे व मालमत्ता बिले वितरित केली आहेत. काही गाळेधारकांनी हरकत कायम ठेवून प्रशासनाने दिलेल्या बिलांच्या रकमेनुसार भरणा न करता विशिष्ट रकमेचाच भरणा केला. परंतु गाळेधारकांनी अद्याप पूर्ण भाडे व मालमत्ता कराची रक्कम भरलेली नाही. त्यात सुमारे सतराशे गाळेधारकांनी भरलेल्या रकमेतून केवळ 22 कोटी रुपये वसूल झाले. थकीत भाडेबाबत आज दुपारी तीनला आयुक्तांनी त्यांच्या दालनात घेतलेल्या बैठकीत "मनपा'च्या मुदत संपलेले व्यापारी संकुलांतील गाळेधारक प्रतिनिधी उपस्थित होते. 

चार महिने उलटूनही भरणा नाही 
"मनपा' निवडणुकीनंतर आयुक्तांनी गाळेधारकांच्या प्रतिनिधींना बोलावून थकीत रक्कम भरण्याचे सांगितले. परंतु चार महिने उलटूनही गाळेधारकांनी पैसे न भरल्याने आज आयुक्तांनी बैठक बोलावून थकीत गाळेभाडे भरण्यास सोमवारपर्यंत (24 डिसेंबर) मुदत दिली. 

..अन्यथा 26 नंतर कारवाई 
24 डिसेंबरपर्यंत गाळेभाडे भरण्याचा "अल्टिमेंटम' आयुक्तांनी दिला आहे. जर 24 डिसेंबरपर्यंत गाळेधारकांनी पैसे न भरल्यास 26 डिसेंबरनंतर गाळेधारकांवर कारवाई होईल, असा इशारा आयुक्तांनी गाळेधारकांच्या प्रतिनिधींना दिला. 

..तर बिलात रक्कम समायोजीत करू 
बैठकीत गाळेधारकांनी प्रश्‍न उपस्थित करून शासनाकडून नियमात बदल होणार असून, थकीत रक्कम कमी होणार आहे, असे आयुक्तांना सांगितले. आयुक्तांनी गाळेधारकांना शासनाचा पैसा कोणालाही माफ होत नसून काही बदल व निर्णय झाल्यास बिलांमध्ये ते समायोजीत केले जातील, असे सांगितले. 

थकीत रकमेवर 6 टक्के व्याज 
महापालिकेने मे 2018 पर्यंत बजावलेले गाळेभाडे, मालमत्ता करांची रक्कम गाळेधारकांनी हरकत कायम ठेवून काही प्रमाणात रक्कम भरलेली आहे. त्यामुळे महापालिकेने या थकीत रकमेवर आता 6 टक्के व्याज लावले आहे. तसेच बिलावर 18 टक्के "जीएसटी' कराचाही समावेश केला आहे. 

तीन महिन्यांच्या बिलांचा बोजा 
गाळेभाडे अन्‌ मालमत्तांच्या बिलांची पूर्ण रक्कम गाळेधारकांनी भरलेली नाही. त्यात महापालिकेने चालू वर्षाचे तीन महिन्यांचे भाडे व मालमत्ता कराची बिले वितरित करण्याचे काम सुरू केले आहे. गाळेधारकांवर आधीच्या बिलांची थकीत रक्कम व तीन महिन्यांचा सुमारे दहा कोटी रुपये बिलांचा आणखी बोजा गाळेधारकांवर पडणार आहे. 

अशी आहे आकडेवारी 
- "मनपा'ची मुदत संपलेली 18 संकुले 
- दोन हजार 387 गाळे 
- थकीत भाडे तीनशे कोटी 
- 1,700 गाळेधारकांनी भरली काही रक्कम 
- 22 कोटी रुपये वसुली 

Web Title: marathi news jalgaon muncipal corporation vyapari sankul thakbaki