मनमानी कारभारामुळे शहरात पाणीटंचाई 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

जळगाव : शहरातील बहुतांश भागांत नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पाणीपुरवठा होत नाही. अनेक प्रभागांमध्ये व्हॉल्व्हमन नागरिकांकडून पैसे घेऊन पाणीपुरवठा करतात, तसेच अनेक भागांत तर पाणीच सोडले जात नसून, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याच्या आढावा बैठकीत केला. यावेळी या सर्व आरोपींची दखल घेत यात सुधारणा करण्याच्या सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

जळगाव : शहरातील बहुतांश भागांत नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पाणीपुरवठा होत नाही. अनेक प्रभागांमध्ये व्हॉल्व्हमन नागरिकांकडून पैसे घेऊन पाणीपुरवठा करतात, तसेच अनेक भागांत तर पाणीच सोडले जात नसून, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याच्या आढावा बैठकीत केला. यावेळी या सर्व आरोपींची दखल घेत यात सुधारणा करण्याच्या सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

शहरातील पाणीपुरवठा, आरोग्य व वीज विभागाच्या समस्यांबाबत महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली आज महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात आढावा आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर महापौर सीमा भोळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, जितेंद्र मराठे, भगत बालाणी, डॉ. सुनील महाजन उपस्थित होते. या बैठकीत नगरसेवकांनी व्हॉल्व्हमन पैसे घेऊन पाणीपुरवठा करत असल्याचा आरोप करीत पुढील दोन दिवसांत पाणीटंचाई संपुष्टात न आल्यास बैठकीत उपस्थित असलेल्या नगरसेवकांनी आंदोलन करण्याचा इराशा दिला. त्यानंतर शहरातील पाणीपुरवठ्याबाबत माहिती देताना अभियंता डी. एस. खडके म्हणाले, की शहरातील पाणीटंचाई निवारणासाठी नवीन 6 व्हॉल्व्ह बसविण्यात आले असून, दोन पंपांपैकी एक पंप कार्यान्वित आहे. त्यामुळे तासाला 6 लाख लिटर पाणी जळगावकरांना अतिरिक्त मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच कूपनलिका दुरुस्त करण्यासाठी दोन वेळा निविदा काढूनही त्यास प्रतिसाद लाभलेला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

गळतीच्या प्रश्‍नावरून नगरसेवक आक्रमक 
शहरातील पाण्याच्या टाक्‍यांच्या गळतीकडे सर्वांच दुर्लक्ष आहे. पाण्याच्या टाकीला असलेल्या गळतीचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी छायाचित्र काढून पीठासीन अधिकाऱ्यांना दाखवीत त्यांचे लक्ष वेधून घेतले. तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या "वाघूर'च्या जलवाहिनीला गळती लागली असून, हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने लहान लहान लिकेज देखील अभियंत्यांकडून दुरुस्त केले जात नसल्याचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी सांगितले. यावेळी पार्वताबाई भिल, कुलभूषण पाटील, उज्ज्वला बेंडाळे यांनी देखील पाण्याच्या समस्या मांडून अधिकारी कमचाऱ्यांना धारेवर धरीत संताप व्यक्त केला. 
 
...तर मी राजीनामा देतो 
शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात पूर्वीपासूनच 15 दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्याची समस्या नगरसेवक गणेश सोनवणे यांनी सभेत मांडली. महापालिका प्रशासनाकडून पूर्वी या ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा केला जायचा; परंतु तो देखील आता बंद करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगताच पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी सुप्रिम कॉलनीत 6 दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्याचे सांगितले. यावर नगरसेवक सोनवणे संतप्त होत म्हणाले, की तुम्ही 6 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याचे दाखवा, मी राजीनामा देतो, असे आव्हान त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon muncipal corporation water tanchai