दारूच्या नशेत भावानेच केला भावाचा खून 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

जळगाव : पिंप्राळा हुडकोत शुक्रवारी रात्री दोघं भावांचे कडाक्‍याचे भांडण झाले. भांडण मिटवून कुटुंबीय झोपलेले असताना दारूच्या नशेतील मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्‍यात लाकडी दांड्याचा प्रहार करून खून केला. पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मात्र, संशयिताने लहान भाऊ दीपक मरसाळे याने गळफास घेतल्याचा कांगावा केला. 

जळगाव : पिंप्राळा हुडकोत शुक्रवारी रात्री दोघं भावांचे कडाक्‍याचे भांडण झाले. भांडण मिटवून कुटुंबीय झोपलेले असताना दारूच्या नशेतील मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्‍यात लाकडी दांड्याचा प्रहार करून खून केला. पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मात्र, संशयिताने लहान भाऊ दीपक मरसाळे याने गळफास घेतल्याचा कांगावा केला. 

तक्रारीत नमूद केल्या प्रमाणे, प्रल्हाद तानकू मरसाळे (रा. पिंप्राळा, हुडको) यांना तीन मुले आहेत. मोठा मुलगा विजय मरसाळे हा जैनाबाद परिसरात पत्नी मुलाबाळांसह वास्तव्यास आहे. तर जय मरसाळे (वय 35) आणि दीपक मरसाळे (वय 25) हे दोन्ही भाऊ आई-वडिलांसह पिंप्राळा हुडकोत मातंग वाड्यात राहतात. वडील आणि मुलं मोल मजुरी करतात. शुक्रवारी संध्याकाळी कामावरून परतल्यानंतर मोठा भाऊ जय आणि दीपक यांच्यात पैसे आणि दारू पिण्यावरून वादाला सुरवात झाली. नेहमीचा वाद म्हणून कुटुंबीयांनी दुर्लक्ष केले, रात्री साडेनऊच्या सुमारास एकत्र जेवण संपल्यावर सर्व झोपण्यासाठी निघून गेले. जेवणानंतर पुन्हा हाणामारी झाल्याने वडील प्रल्हाद आणि जयची पत्नी रेखा यांनी दोघांचे भांडण सोडल्यावर दोघेही झोपून गेले. पहाटे साडेपाचच्या सुमारास जयने आरडा ओरड करीत लहान भाऊ दीपकने गळफास घेतल्याचे आई- वडिलांना सांगितले. मुलगा दीपक हा बिछान्यावरच मृत अवस्थेत पडलेला होता. घटनेची माहिती पोलिसांना कळताच सकाळी पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळावर दाखल झाला. 

आत्महत्येचा बनाव 
दीपकचा निपचित पडलेला मृतदेह आणि घरात रक्ताचा घुमट वास येत होता. निरखून बघितल्यावर जमिनीवर पुसलेले रक्त दिसून आले. वडील प्रल्हाद यांना शंका आल्याने त्यांनी दरडावूनच जयला विचारपूस केली. मी, झोपलेला असतानाच दीपक पंख्याला लटकवून घेतले, सकाळी पाहिल्यावर त्याला खाली उतरवताना तो, खाली पडल्याने डोक्‍यावर जखम झाली व त्यातून रक्त वाहिल्याचे जय सांगत होता. घडला प्रकार संशयास्पद असल्याने वडील प्रल्हाद व जय यांच्यात हमरीतुमरी होऊन. माझं म्हणणे ऐकत नाही म्हणून. जयने वडिलांनाही मारहाण केली. 

गोधडीसह तो, दांडा जप्त 
घटनास्थळावर सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, गुन्हेशाखेचे निरीक्षक, फॉरेन्सिक पथक दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करण्यात येऊन घटनास्थळावर सांडलेल्या रक्ताचे नमुने संकलित करून पोलिसांनी बिछान्यावरील गोधडी, लाकडी दांडा ताब्यात घेत संशयिताला अटक केली. अटकेनंतर संशयिताची प्राथमिक चौकशी केल्यावर त्याने पोलिसांनाही उडवा उडवीची उत्तरे दिली. अटक करून त्याला पोलिस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon murder brother wine