जळगावचे 100 आजी-माजी नगरसेवक गोत्यात 

जळगावचे 100 आजी-माजी नगरसेवक गोत्यात 

जळगाव : जळगावच्या घरकुल घोटाळ्याचे भूत मानगुटीवरून उतरत नाही, तोच पालिकेत गतकाळात पाच प्रकरणांमध्ये झालेल्या गैरव्यवहारांच्या तपासाने तत्कालीन सत्ताधारी शंभर आजी माजी नगरसेवकांच्या पोटात कारवाईच्या भीतीचा गोळा उठला आहे. या प्रकरणात दाखल गुन्ह्यांचा तपास पूर्णत्वाकडे आल्याचा अहवाल तपासाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात सादर केल्याने लवकरच या नगरसेवकांवर कारवाई होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा कारवाईचा बॉंबगोळा पडण्याच्या भीतीने संबंधित नगरसेवकांची पाचावर धारण बसली आहे. 

तत्कालीन पालिका असताना वाघूर पाणीपुरवठा योजनेसह विमानतळ विकास व जिल्हा सहकारी बॅंकेशी संबंधित गैरव्यहारप्रकरणी दाखल गुन्ह्यांचा तपास रखडल्याने याविरुद्ध त्रयस्थ अर्जदार म्हणून नरेंद्र पाटील यांनी ऍड. ब्रम्हे यांच्यामार्फत 2015 मध्ये खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्या. एस. एस. शिंदे व न्या. जाधव यांच्या द्विसदस्यीय पीठासमोर कामकाज सुरू असून, पंधरा दिवसांपूर्वी खंडपीठाने या गुन्ह्यांच्या तपासाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. 

गुन्ह्यांचा तपास पूर्णत्वाकडे 
त्यानुसार सरकार पक्षाने प्रतिज्ञापत्र सादर न करता या गुन्ह्यांमध्ये तपास जवळपास पूर्ण झाला असून, आता फिर्यादीने नमूद गैरव्यवहाराची रक्कम व प्रत्यक्षात चौकशीदरम्यान समोर आलेले तथ्य यासंबंधी रकमेची पडताळणी सीएकडून करून घ्यायची आहे, असा अहवाल सादर केला. त्यावर खंडपीठाने आता 19 जुलैस पुढील सुनावणी ठेवली आहे. 

काय आहे प्रकरण..? 
तत्कालीन पालिकेने राबविलेल्या वाघूर पाणीपुरवठा योजना, विमानतळ विकास प्रकल्प या कामांमध्ये संबंधित मक्तेदारांना बिनव्याजी ऍडव्हान्स देणे, करारातील अटी-शर्ती बदलणे, मक्तेदाराचा फायदा होईल अशा अटी घालणे या माध्यमातून कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याबाबत नरेंद्र भास्कर पाटील यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली होती. तसेच जिल्हा बॅंकेतील कथित आयबीपी खात्याच्या गैरव्यवहारप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांतही अर्ज देण्यात आला. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. म्हणून नरेंद्र पाटील यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. नंतर खंडपीठाच्या आदेशान्वये शहर पोलिसांत वाघूर व विमानतळ गैरव्यवहारप्रकरणी दोन गुन्हे व जिल्हापेठ पोलिसांत जिल्हा बॅंकेशी संबंधित तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


गैरव्यवहाराचे गुन्हे 
- वाघूर योजना : शहर पोलिस 
- विमानतळ विकास : शहर पोलिस 
- जिल्हा बॅंक (आयबीपी) : जिल्हा पेठ पोलिस 
 
गुन्हा व्यापक स्वरूपाचा व आर्थिक बाबीशी निगडित आहे. फिर्यादीत नमूद गैरव्यवहाराची रक्कम व व्यवहारासंबंधी लेखापरीक्षण करावे लागणार आहे. गुन्ह्याच्या आतापर्यंत तपासाची प्रगती खंडपीठात सादर केली आहे. 
- प्रशांत बच्छाव, तपासाधिकारी 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com