नाले ब्लॉक! वस्त्यांना धोका 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

जळगाव : महापालिकेसह जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहर-तालुक्‍यांच्या ठिकाणी नाले, मोठ्या गटारांची सफाई ही मोठी समस्या बनली आहे.नाले ब्लॉक झाल्याने अस्वच्छतेने उच्छाद मांडला. काही ठिकाणी झालेले नाल्याचा प्रवाह बदलण्याचे प्रकार, नाल्यालगत व नाला बुजून झालेले अतिक्रमण व पावसाळ्यापूर्वी अर्धवट होणारी सफाई त्यामुळे नाल्यांलगतच्या वस्त्यांना पुराचा धोका कायम आहे. कमी-अधिक प्रमाणात सर्वच पालिका क्षेत्रात हा गंभीर प्रश्‍न बनला असला तरी प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

जळगाव : महापालिकेसह जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहर-तालुक्‍यांच्या ठिकाणी नाले, मोठ्या गटारांची सफाई ही मोठी समस्या बनली आहे.नाले ब्लॉक झाल्याने अस्वच्छतेने उच्छाद मांडला. काही ठिकाणी झालेले नाल्याचा प्रवाह बदलण्याचे प्रकार, नाल्यालगत व नाला बुजून झालेले अतिक्रमण व पावसाळ्यापूर्वी अर्धवट होणारी सफाई त्यामुळे नाल्यांलगतच्या वस्त्यांना पुराचा धोका कायम आहे. कमी-अधिक प्रमाणात सर्वच पालिका क्षेत्रात हा गंभीर प्रश्‍न बनला असला तरी प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. नाल्यातील कचरा काठावर जमा केला जातो, तोच कचरा पाऊस आल्यानंतर पुन्हा नाल्यात अन्‌ रस्त्यावर जाऊन पाणी तुंबण्याची समस्या कायम राहते. 

पावसाळा दहा दिवसावर बाकी असून महापालिकेतर्फे नालेसफाईचे काम केवळ 50 टक्केच झालेले आहे. सुरवातीला नालेसफाई अजिबात झाली नसल्याने येत्या दहा दिवसात संपूर्ण शहरातील नालेसफाईचे काम करण्याचे आव्हान मनपा प्रशासनासमोर आहे. मुख्य नाल्यांची प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत पूर्ण केली जात असून मुख्य नाल्यांची सफाईचे काम 50 टक्के बाकी आहे. तर उपनाल्यांच्या सफाईचे काम कासवगतीने सुरू आहे. तसेच उपायुक्तांनी नाल्यांवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश देऊनही हे अतिक्रमण काढले नसल्याचे चित्र आहे. 

मुख्य नाल्यांची जबाबदारी प्रभाग अधिकाऱ्यांवर 
शहरात 5 मुख्य नाले, 67 उपनाले आहे. मुख्य नाले सफाईची कामे हे प्रभाग अधिकाऱ्यांवर सोपवली असून मक्तेदारांच्या माध्यमातून सफाई केली जाणार आहे. तर उपनाल्यांच्या सफाईचे काम बांधकाम, आरोग्य विभागाच्या माध्यमातून केले जात आहे. मनपाच्या चार प्रभाग समितीची अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रभागातील नालेसफाईची जबाबदारी दिलेली आहे. 4 जेसीबी,2 पोकलॅंन्ड, ट्रॅक्‍टरच्या माध्यमातून नालेसफाई केली जात आहे. तर उपनाल्यांच्या सफाईसाठी बांधकाम विभागाचे जेसीबी, ट्रॅक्‍टर आदी वाहने आहेत. 

नाल्यांवरील गाळ काठावरच! 
मनपा प्रशासन तसेच मक्तेदारांच्या माध्यमातून शहरातील नाले सफाई केली जात आहे. परंतु नाल्यातून काढलेला कचरा, गाळ हा नाल्यांच्या किनाऱ्यावर टाकला जातो. हा कचरा व गाळ उचला न जाता तसाच ठेवला जात असून जोरदार पाऊस आल्यास हा कचरा व गाळ पुन्हा नाल्यात जाऊन प्रवाह अडण्याची शक्‍यता असून त्यामुळे वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याचा धोका आहे. 

गटारांच्या स्वच्छतेला सुरवात नाही 
शहरातील गटारांची स्वच्छता करण्याचे काम आरोग्य विभागातर्फे 22 प्रभागात तर खासगी मक्तेदारास 25 प्रभागांतील स्वच्छतेचा मक्ता दिला आहे. परंतु, पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील गटारांची सफाईला अद्याप सुरवात झालेली दिसत नाही. मुख्य व लहान नाल्यांसोबत गटारांचीदेखील सफाई होणे आवश्‍यक आहे. सफाई न झाल्यास पावसाळ्यात गटारातील पाण्याचा निचरा न झाल्यास पाणी साचून रोगराई पसरण्याचा धोका आहे. 

या ठिकाणी पुराचा धोका 
शहरातून गेलेले पाच मुख्य नाल्यामध्ये मेहरुण स्मशानभूमी, मिल्लत हायस्कूलजवळील नाला, गोपाळपुरा, गुरूनानानक नगर, चौघुले प्लॉट, कासमवाडी तसेच किसनराव नगर येथील नाल्याजवळ जोरदार पाऊस झाल्यास पुराचा धोका आहे. 

अशी आहे आकडेवारी 
- मुख्य नाले : 05 
- उपनाले : 67 
- सफाईवरील खर्च : 15 लाख 
- नाल्यांची लांबी : 23 किलोमीटर

Web Title: marathi news jalgaon nale block