माणसाचा जीव इतका स्वस्त व्हावा? 

माणसाचा जीव इतका स्वस्त व्हावा? 

ज्याला भावना आहेत, त्या प्रत्येक मनाला चटका लावणाऱ्या घटना अलीकडे बऱ्यापैकी वाढल्या आहेत. गेल्या दोन-चार दिवसांत तर जळगाव जिल्ह्यातून मन सुन्न करणाऱ्या घटनाच समोर आल्या. दुर्दैवानं मन सुन्न होतं. थोडावेळ अशा घटनांबद्दल ते हळहळतं. दोघा-चौघांमधील चर्चेत त्याबद्दल भावनाही व्यक्त करतं. पण त्यानंतर मात्र हे मन जपणारी प्रत्येक व्यक्ती आपापल्या कामाला लागते. कारण काय तर आजच्या सामाजिक व्यवस्थेत वाढलेल्या स्पर्धेने म्हणा की विकृतीने. माणसाचा जीव भलताच स्वस्त करून टाकलाय. 
 
गेल्या आठवड्यात भडगावातील एक चिमुकला बेपत्ता झाला. काही काळानंतर त्याचा मृतदेह आढळून आला आणि समाजमन हळहळलं.. अर्थात, त्यावेळी कुणाला माहीत होतं, या चिमुकल्याशी संबंधित कुटुंबावर आणखी एक मोठी अवकळा कोसळणार आहे ते? काही दिवस उलटताच शनिवारी याच कुटुंबातील म्हणजे त्या बालकाच्या आई-वडिलांसह मुलीचाही जीव गेला. आता हा आत्महत्येचा प्रकार आहे, घातपात आहे की नरबळीचा अघोरी प्रकार? याबद्दल तर्कवितर्क लढविले जात आहेत. यातील कोणत्याही स्वरूपातला असेल, तरीही तो जीव स्वस्त झाल्याचे संकेत देणारा गंभीर प्रकारच म्हटला पाहिजे. 
ही घटना समोर येत असतानाच गेल्यावर्षी आदेशबाबा नामक भोंदूस सातवर्षीय बालिकेचे अपहरण, तिच्यावर अत्याचार करुन हत्या केल्याच्या गुन्ह्यात मरेपर्यंत जन्मठेप झाली. खरेतर हा प्रकार अमानवी याच व्याख्येतील आहे. न्यायालयाने या मन हेलावून टाकणाऱ्या प्रकारात केवळ जन्मठेप (ती सात, चौदा वर्षांचीही असू शकते) असा शब्द न वापरता "मरेपर्यंत जन्मठेप' असे "स्पेसिफिक' म्हटलेय.. आणि अशाप्रकारच्या प्रत्येक गुन्ह्यात एवढीच गंभीर शिक्षा असणे गरजेचे आहे. दुर्दैवाने ही शिक्षा सुनावण्याच्या दिवशीच जन्मदात्या पित्याने मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणे, ही समाजातील विकृती, कीड दर्शविणारी घटना समोर आली. तेदेखील आपल्या म्हणायला प्रगत समाजाचे दुर्दैवच! 
उन्हाळ्याची चाहूल लागली की, लग्नसराईही जोर धरते. उन्हातान्हात विवाहाचे नियोजन करणाऱ्या वर-वधूंकडील मंडळीही आपला जीव धोक्‍यात घालूनच कामाला लागतात. एखाद्याच्या घरी विवाह म्हणजे साऱ्या जगाचा तणाव त्या कुटुंबावरच! अशी अवस्था लोक करुन घेतात. आणि मग, जिवावर उदार होऊन भर उन्हात दुचाकीनं जीवघेण्या महामार्गावरुन प्रवासालाही लागतात. शनिवारी रात्री लग्नपत्रिका वाटणाऱ्या दोघा तरुणांना अपघातानं बळी ठरवलं. सोशल मीडियावर लग्नसराईत "पत्रिकेचा विषय प्रतिष्ठेचा करू नका, अगदी तोंडी निरोप मिळाला तरी लग्नाला या.' असे खरेतर चांगल्या उपदेशाचे डोस पाजले जात असले तरी याच मीडियावरील अन्य पोस्ट गांभीर्याने घेणारा समाज हा जीव जपणारा संदेश दुचाकीखाली तुडवतो आणि जीव धोक्‍यात घालतो.. तरुणांच्या अपघाताची घटना ताजी असली तरी गेल्या आठवड्यात एक वधूपित्यानेही अशाच अपघातात आपला जीव गमावला. 
वेळेचे नियोजन केलेच पाहिजे. पण किंमती वेळेची बचत व्हावी म्हणून अनमोल जिवालाच काळासमोर उभे करावे, हे कितपत योग्य आहे? कुणी स्वार्थासाठी, कुणी विकृतीतून जीव घ्यायला निघालेय. तर कुणी समजत असूनही जीव धोक्‍यात घालून समाजात वावरत आहे. अन्य घटनांवरून समाजमन अस्वस्थ होत असेल, तर "आपला जीव इतका स्वस्त का व्हावा?' असा प्रश्‍न या समाजमनाला पडत नसेल तर काय? 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com