"नॉनस्टॉप' 22 तास ड्युटी प्रकरण : चालक, वाहकांना नोटीस

"नॉनस्टॉप' 22 तास ड्युटी प्रकरण : चालक, वाहकांना नोटीस

जळगाव ः राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून आरामदायी प्रवास असतो. परंतु विभाग किंवा आगाराचे उत्पन्न वाढविण्यासाठी लांबपल्ल्याच्या बसफेऱ्यांना स्थानिक फेऱ्यांप्रमाणे पुण्याहून तासाभरातच परतीच्या प्रवासाचा धोका पत्करला जात आहे. यात प्रशासनाकडून तोंडी आदेशाची सक्‍ती, तर कधी चालक, वाहकांची मनमानी कारण ठरते. परंतु या प्रकाराला सर्वस्वी चालक, वाहकांनाच जबाबदार धरले असून, अशा फेऱ्या करणाऱ्या 20 जणांना नोटीस बजावून एस.टी. महामंडळ प्रशासनाने खुलासा मागविला आहे. 
"प्रवासी हिताय- प्रवासी सुखाय' हे ब्रीद घेऊन राज्य परिवहन महामंडळाची सेवा सुरू असताना आगाराचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने लांबपल्ल्याच्या बसफेऱ्यांना महामंडळाच्या नियमांत बसत नसताना जळगाव विभागातून पुण्याला जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या बस मुक्‍कामी न थांबविता त्याच दिवशी रिटर्न मार्गस्थ केल्या जात होत्या. सदर प्रकार "सकाळ'ने "चालकाची ड्युटी "नॉनस्टॉप' 22 तास...' या मथड्याखाली उघडकीस आणला. या प्रकारानंतर जळगाव आगार व विभागीय कार्यालयाची चौकशी वरिष्ठ पातळीवरून होऊन फेऱ्यांबाबतचा संपूर्ण अहवाल मागविला होता. आगार स्तरावरून प्रथम फेऱ्या बंद करून पुणे येथे मुक्‍कामी राहण्याचे आदेश काढले. यानंतर अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला. परंतु आता गेल्या काही महिन्यांत जळगाव-पुणे मार्गावरून जाणाऱ्या चालक, वाहकांनाच जबाबदार धरण्यात आले आहे. 

अधिकाऱ्यांचे हात वर 
जळगाव-पुणे अशी नॉनस्टॉप 22 तासांची ड्युटी करण्याच्या प्रकारात अधिकाऱ्यांकडून बऱ्याचदा सक्‍ती करण्यात आली होती. तर काही वेळेस चालक, वाहकांनी मनमानी करत बस परत आणली होती. परंतु सदर प्रकारात प्रशासनाने हात वर केले आहेत. नियमबाह्य ड्युटी असल्याने "रेकॉर्ड'वर सलग 22 तास ड्युटीची कोणत्याही प्रकारची नोंद नसल्याने या प्रकाराला सर्वस्वी चालक, वाहकांना जबाबदार धरून 20 जणांना नोटीस दिली आहे. 

नोटीस दिल्याने कर्मचाऱ्यांत नाराजी 
जळगाव आगारातून पहाटे पाचला सोडण्यात येणारी पुणे बस लागलीच परत होण्याचे प्रकार सुरू होते. गेल्या काही महिन्यांत अशी सेवा बजावणाऱ्या चालक, वाहकांना आगार स्तरावरून नोटीस बजावण्यात आली आहे. यात साधारण वीस कर्मचाऱ्यांना ही नोटीस देण्यात आली. या नोटिशीमुळे चालक, वाहकांत नाराजी असून, नोटीस आल्याने प्रशासनाकडून या फेरीतील ओव्हरटाइमची रक्‍कम घेण्याच्या विचारात कर्मचारी आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com