ऑनलाइन मोबाईल खरेदीतून फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

जळगाव ः ऑनलाइन वस्तू खरेदी करून मागविलेल्या पार्सलमध्ये कोणतीही वस्तू निघाली नाही. याचा राग आल्याने संबंधिताने पोस्टमनला मारहाण केली. ही घटना मोहाडी रोडवरील बालाजी हाईट्‌समध्ये आज दुपारी साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला. मात्र, नागरिकांची मध्यस्थी तसेच पोस्टमनला मारहाण करणाऱ्यांनी माफीनामा लिहून दिल्याने वादावर पडदा पडला. 

शहरातील बालाजी हाईट्‌समधील रहिवासी पीयूष घनश्‍याम मंधवानी याने दिल्लीच्या कंपनीकडे ऑनलाइन मोबाईल बुकिंग केला. त्यानुसार आज दुपारी पोस्टमन संबंधित पार्सल घेऊन मंधवानीच्या घरी आले. दरम्यान, पोस्टमनने ते पार्सल पीयूषकडे देऊन त्याच्याकडून चार हजार शंभर रुपये घेऊन त्याची पार्सल मिळाल्याची स्वाक्षरीही घेतली. त्यानंतर पोस्टमन पार्सल वाटपासाठी बालाजी हाईट्‌सच्या खाली येऊन पार्सल वाटपासाठी जायला निघाले. यावेळी पीयूष मंधवानीने धावत येऊन पोस्टमनकडून दिलेले पैसे परत मागितले. परंतु पार्सल मिळाल्याबाबत पीयूषने स्वाक्षरी केली असल्याने त्यांनी पैसे देऊ शकत नसल्याचे सांगितले. त्याचा राग आल्याने पीयूष मंधवानी व त्याच्यासोबतच्या तरुणाने पोस्टमनचा हात वाकवून त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडे असलेले पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला. 

परिसरातील नागरिकांची मध्यस्ती 
पीयूष मंधवानी पोस्टमनसोबत वाद घालत त्यांना मारहाण करीत असल्याचे दिसताच परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी केली. त्यानंतर पोस्टमननेही त्यांच्या सहकाऱ्यांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिल्यावर त्यांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोस्टमन व परिसरातील काही नागरिकांनी मध्यस्थी केली. तसेच पीयूषचे वडीलही तेथे आल्यावर त्यांनी संबंधित प्रकाराबद्दल माफीनामा लिहून दिल्याने वादावर पडदा पडला. 

ऑनलाइन फसवणुकीचे अनेक प्रकार 
दिल्ली, मुंबई, बेंगळुरू येथून चायना मोबाईलच्या नावाने ऑनलाइन बुकिंग करून खरेदीचा ट्रेंड वाढला असून, कंपनीची खात्री केल्याशिवाय आमिषाला बळी पडून बनावट कंपन्यांकडून ग्राहकांची लूट होत असल्याचे प्रकार यापूर्वीही उघड झाले आहेत. मात्र, या प्रकरणी रीतसर तक्रार दाखल करण्यासाठी कुणीही धजावत नसल्याचे दिसते.

Web Title: marathi news jalgaon online shoping