ओपिनियन मेकर - नागरी सुविधांच्या पूर्ततेनंतरच विकासाचा मार्ग सुकर : डॉ. गिरीश सहस्रबुद्धे

girish sahsrbudhe
girish sahsrbudhe

शहरात नागरी सुविधांचा अभाव असून, पालिकेच्या आर्थिक स्थितीमुळे सर्व नागरी सुविधा प्रभावित होत आहेत. नागरिकांना रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य या मूलभूत सुविधांव्यतिरिक्त कोणतीही अपेक्षा नाही. त्यादेखील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिका पुरवू शकत नसेल तर नियोजन कुठेतरी चुकते आहे. त्यासाठी नव्याने निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी भूतकाळात न डोकावता शहराचे वर्तमान सुसह्य कसे होईल, याचा विचार करून काम केले पाहिजे. 

दो न-तीन दशकांपूर्वी जळगाव चांगले विकसनशील शहर म्हणून ओळखले जात होते. येथील संकुले, उद्योग, व्यवसायाचे दाखले दिले जायचे. मात्र, नंतरच्या काळात शहराच्या विकासाला खीळ बसली. शहरातील समस्यांचे मूळ नागरी सुविधांमध्ये आहे. शहराची लोकसंख्या वाढते, तसा त्याचा विस्तार वाढतो. विस्तार वाढला, की त्यानुसार रस्ते, गटार, पथदिवे, पाणीपुरवठा यासारख्या सुविधांची व्याप्ती वाढते. वाढत्या शहरानुसार त्या शहराला पुरविल्या जाणाऱ्या सुविधांचे जाळेही निर्माण होणे गरजेचे असते. त्यासाठी पालिका कररूपातून उत्पन्न मिळवते. या उत्पन्नाचे योग्य नियोजन करून त्याचा योग्य मोबदला सुविधांच्या रूपाने नागरिकांना देणे अपेक्षित आहे. मात्र, कुठेतरी धोरण चुकले की समस्या निर्माण होतात. सर्वच शहरांमध्ये कमी-अधिक प्रमाणात अशी स्थिती निर्माण झालेली आहे. जळगावातील समस्या अधिक आहेत. 
नागरिकांना खूप काही योजना, प्रकल्प अथवा मोठे प्रोजेक्‍ट्‌स नको. शहराच्या व्याप्तीनुसार चांगले रस्ते, वाढीव वस्त्यांमध्ये रस्ते, गटार, शुद्ध पाणीपुरवठा, उद्याने, आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधाच महत्त्वाच्या आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे, त्यात आजारांचे प्रमाण वाढून रुग्णसंख्याही वाढते. सार्वत्रिक आजारांचे मूळ स्वच्छतेवर असते. खुल्या गटार, जागांवरील कचरा, पाण्याचे डबके त्यातून डासांचा फैलाव होतो. अशुद्ध पाण्यातूनही अनेक आजार उद्‌भवतात. सध्या दवाखाने "फुल्ल' आहेत, त्याचे कारणच ही अस्वच्छता आहे. त्यावर नियंत्रण ठेवले तर शहराचे आरोग्य सुधारू शकेल. असेच अन्य सुविधांबाबतही म्हणता येईल. त्या पुरेशा प्रमाणात मिळाल्या की नागरिकांच्या तक्रारी आपोआपच संपतात. 
दर पाच वर्षांनी निवडणुका येतात, विविध पक्ष व गटाचे नेते आश्‍वासने देऊन मते मिळवितात. आरोप-प्रत्यारोपांनंतर पालिकेत नवीन नगरसेवक निवडून जातात. त्यात सत्ता कुणाची, कोण पदाधिकारी, यापेक्षा सर्वच नगरसेवकांनी आपण आपल्या प्रभागाचे सेवक आहोत, हे समजून काम केले पाहिजे. अन्य विषयात न पडता आपापल्या प्रभागावर नगरसेवकांनी लक्ष ठेवले, तेथील सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा केला तर बऱ्याच समस्या दूर होतील. नागरी सुविधा पुरेशा प्रमाणात मिळाल्या की पुढचा विकासाचा मार्ग सुकर होतो. याबाबत नगरसेवकांनी आणि प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही जबाबदारीने काम करणे अपेक्षित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com