चालक 22 तास "स्टेअरिंग'वर; दोन दिवसांच्या सुटीसाठी प्रवाशांच्या जिवाशी खेळ! 

चालक 22 तास "स्टेअरिंग'वर; दोन दिवसांच्या सुटीसाठी प्रवाशांच्या जिवाशी खेळ! 

जळगाव ः परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास हा आरामदायी मानला जातो; परंतु विभाग किंवा आगाराचे उत्पन्न वाढविण्यासाठी लांबपल्ल्याच्या बसफेऱ्यांना स्थानिक फेऱ्यांप्रमाणे पुण्याहून तासाभरातच परतीच्या प्रवासाचा धोका पत्करला जात आहे. अर्थात यात कधी प्रशासनाची होणारी सक्‍ती तर कधी चालक- वाहकांची मनमानी कारणीभूत ठरत आहे. या प्रकारात दोन दिवसांच्या सुटीकरिता बसमधील 45 प्रवाशांच्या जिवाशी खेळ होत असल्याचा विचार केला जात नाही. 
राज्य परिवहन महामंडळ आपल्या बोधचिन्हावर "प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीद घेऊन गेल्या 71 वर्षांपासून अविरतपणे धावत आहे. बसच्या रचनेत अनेक बदल झाले; ते केवळ प्रवाशांच्या सुरक्षित प्रवास होण्याच्या दृष्टीनेच. आजही प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात असले, तरी लांबपल्ल्यावर धावणाऱ्या बसमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर येत आहे. कारण जळगाव- पुणे मार्गावर धावणारी बस जळगावहून सुटल्यानंतर नऊ- दहा तासांनंतर पुण्याला पोहचत असते. हीच बस अवघ्या तासाभरात जळगावकडे परतीच्या प्रवासाला निघते. यात प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार होत नसल्याने बसमधील असुरक्षित प्रवास असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

नियम म्हणतो...9 तास आराम 
परिवहन महामंडळाने चालक- वाहकांना सेवा बजावीत असताना काही नियम आखून दिले आहेत. यात प्रामुख्याने लांबपल्ल्याची बस घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष करून चालकाने किमान नऊ तास आराम करण्याचा नियम ठरवून दिला आहे; परंतु जळगावहून निघालेली बस दहा तासांनी पुण्याला पोहोचते; ती मुक्‍कामी राहून दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवाशांना घेऊन मार्गस्थ होण्यासाठी. अर्थात या फेरीमध्ये मुक्‍काम केल्यास चालकाचा बरोबर नऊ- दहा तासांचा आराम होऊन दुसऱ्या फेरीसाठी सज्ज होत असतो; परंतु महामंडळाच्या या नियमांचे अगदी उघडपणे उल्लंघन केले जात असून, केवळ तासभर थांबून बस पुन्हा रवाना केली जात असल्याचा प्रकार महामंडळात सुरू आहे. 

प्रवासी धोक्‍यात; अधिकारी बिनधास्त 
एसटीचा गर्दीच्या हंगामात उत्पन्न वाढीसाठी लागलीच परत येण्याचा प्रकार नियमित सुरू असतो. इतर वेळी मात्र चालक- वाहक हे स्वतःच्या जबाबदारीवर बस परत मार्गस्थ करत असतात. या प्रकारात अपघात होण्याचा धोका अधिक असतो. कारण चालक आराम न करता अविरत 22 तास स्टेअरिंगवर बसून असतो. यात चालकाची एक डुलकी 45 प्रवाशांना मृत्यूच्या खाईत नेऊ शकते. या प्रकारांकडे अधिकारी वर्ग देखील अगदी बिनधास्त राहून हे प्रकार थांबवीत नाही. चालक- वाहक हे दोन दिवस जोडून सुटीसाठी इतका मोठा धोका पत्करत आहेत. 

वृत्ताला दुजोरा 
चालकाची ड्युटी नॉनस्टॉप 22 तास...या वृत्ताबाबत आगार प्रमुख प्रज्ञेश बोरसे व निलेश पाटील यांनी असे प्रकार आता सुरू नसल्याचे सांगितले आहे. मात्र या वृत्ताला एसटीतील सेवानिवृत्त अधिकाऱ्याने दुजोरा दिला असून, पुर्वी आणि आजही हे प्रकार सुरू असल्याचे "सकाळ'ला सांगितले. तसेच "एसटी' महामंडळातील काही चालक- वाहकांशी बोलल्यानंतर त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर जळगावहून पुणे गेल्यानंतर त्याच दिवशी बस परत आणली जात असल्याचे सांगितले. 
 
प्रत्येक व्यक्‍तीला चोवीस तासातून किमान सात ते आठ तास झोप आवश्‍यक आहे. त्यात लांबच्या प्रवासात बस चालवून नेणाऱ्या चालकासाठी ते आवश्‍यक आहे. असे न करता वीस- बावीस तास गाडी चालवून आणणे धोक्‍याचे होऊ शकते. कारण असे न केल्यास डोळे कोरडे पडतात, चुरचुरतात; शिवाय डोकेदुखीचा त्रास देखील उद्‌भवू शकतो. 
- डॉ. धर्मेंद्र पाटील, नेत्ररोग तज्ज्ञ, जळगाव 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com