Video : रसिकांसाठी यू-ट्यूबवर व्हिडिओ अन्‌ पॉडकास्टवर ऑडिओ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 मे 2020

लॉकडाउन'मध्ये प्रत्येक कार्यक्रम करता येत नसल्याने रसिकांना आपल्या कार्यक्रमांचा आनंद घेता यावा, यासाठी गेल्या वर्षभरात "परिवर्तन'ने केलेल्या कार्यक्रमांचे ध्वनिमुद्रण व चित्रणाचा खजिना उघड करून दिला आहे. 

जळगाव : "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर देशभरात असलेल्या "लॉकडाउन'मुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे अगदी चारभिंतींत बंद झाले. पण कलावंत म्हणून काय करता येईल? कलेच्या माध्यमातून काही करावे, पण आता या काळात लोक जमवून कला सादर करणे शक्‍य नाही. यामुळे "परिवर्तन'ने उत्तम निर्मिती केली असून, ती रसिकांपुढे ठेवण्याचे काम केले आहे. यात यू-ट्यूबवरून व्हिडिओ, तर "पॉडकास्ट'वरून "ऑडिओ क्‍लिप' देण्याचे काम सुरू ठेवले आहे. 

"परिवर्तन' ही सांस्कृतिक संस्था असून, मानसिक आरोग्य सांभाळणे, सकारात्मक दृष्टिकोनाने मानवजातीवरील संकटकाळात माणुसकी जपण्याचे काम कला करते. याच विचारातून "परिवर्तन'ने अनोखा प्रयोग राबविला आहे. "लॉकडाउन'मध्ये प्रत्येक कार्यक्रम करता येत नसल्याने रसिकांना आपल्या कार्यक्रमांचा आनंद घेता यावा, यासाठी गेल्या वर्षभरात "परिवर्तन'ने केलेल्या कार्यक्रमांचे ध्वनिमुद्रण व चित्रणाचा खजिना उघड करून दिला आहे. 

चौदा हजार लोकांनी ऐकले 
"परिवर्तन'ने आपल्या वेबसाइटवरून हा उपक्रम सुरू केला आहे. यात यू-ट्यूबवरून तीन व्हिडिओ आणि "पॉडकास्ट'वरून कार्यक्रमांच्या 35 ऑडिओ क्‍लिप अपलोड केल्या. यात जगप्रसिद्ध "कोसला' ही कादंबरी जगभर ऐकली जाते. यासोबतच अभिवाचनाच्या माध्यमातून "परिवर्तन'ने केलेले वेगवेगळे प्रयोग, विविध प्रकारच्या प्रेमकथा, जीवनविषयक भाष्य, तृतीयपंथीयांचं जगणं, प्रेमातून प्रेमाकडे, भय शून्य चित्तो, गालीबसारखा थोर शायर, रवींद्रनाथ टागोर यांचे साहित्य, दिशा शेख यांची मुलाखत, जगप्रसिद्ध गायिका शबनम विरमानी यांचे कबिराचे दोहे यासारख्या अनेक ऑडिओ व व्हिडिओ लोकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. उपक्रमास अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, फ्रान्समधील मराठी भाषिकांनी, तसेच दिल्ली व राज्यातील अनेक भागांतून साधारण चौदा हजार लोकांनी ऑडिओ क्‍लिप ऐकल्या आहेत. 

रसिकांच्या आल्या प्रतिक्रिया 
"परिवर्तन'ने वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करण्यात आला. यावर असंख्य लोकांचे संदेश, फोन अनेक लोकांनी दिले. याचा उपयोग असाही झाला की जैन उद्योगसमूहाने तयार केलेली व "परिवर्तन'ने उपलब्ध करून दिलेली बहिणाबाई डॉक्‍युमेंटरी फिल्म पाहून अमेरिकेतील मराठी भाषिकांनी कळविले, इतकी सुंदर फिल्म तिथे पाहिली जाते. 

"लॉकडाउन'च्या काळात "परिवर्तन'ने रसिकांसाठी एक वेगळा प्रयोग म्हणून कार्यक्रमांच्या व्हिडिओ व ऑडिओ क्‍लिप यू-ट्यूब आणि "पॉडकास्ट'वरून पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहोत. याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रतिक्रियाही व्यक्‍त करत आहेत. 
- शंभू पाटील, अध्यक्ष, परिवर्तन संस्था, जळगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon parivartan sanstha youtube upload video programe