पत्नीच्या प्रसूतीचा दिवस अन्‌ पतीची अंत्ययात्रा 

accident.
accident.

जळगाव : शहरातील मासुमवाडी येथील कटलरी व्यावसायिक अल्ताफ मोहम्मद ताहेर शेख - मणियार (वय 32) व लहान भाऊ इक्‍बाल मोहम्मद ताहेर (वय 27) या दोघा भावंडांचा पारोळ्याजवळ अपघातात मृत्यू झाला. अल्ताफ यांची पत्नी हिनाबी प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयात दाखल असून, डॉक्‍टरांनी दुपारी दोनची वेळ दिली होती. पत्नीची भेट घेऊन गेल्यानंतर दीड तासांतच नातेवाइकांच्या कानी वाईट बातमी आल्याने एकच धावपळ उडून रुग्णालयातील नातेवाईक जणू गायब झाले. सायंकाळी दोघा भावंडांची सोबत अंत्ययात्रा निघाल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. 

मासुमवाडी येथील मोहम्मद ताहेर शेख - मणियार यांना अल्ताफ, अश्‍पाक, इक्‍बाल आणि मुश्‍ताक अशी चार मुले होती. एकत्र कुटुंबात मोठे भाऊ वाहब यांना मुलबाळ नसल्याने अल्ताफ याला मोठ्या भावाने दत्तक घेतले होते. दोन्ही वयोवृद्ध दाम्पत्य आणि मेहनत करून गुजराण करणारी त्यांची चार मुले, चार सुना, नातवंडे अशा भरल्या परिवाराचा गाडा ओढण्यासाठी चारही भाऊ अंगतोड मेहनत करीत. जळगाव, धुळे, नंदुरबारसह औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये जळगावपासूनजवळ असणाऱ्या मोठ्या गावजत्रा, मोठे आठवडे बाजारात संसारोपयोगी साहित्यांचे दुकान लावून या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. मुलांसह ताहेर शेख हे देखील आज जत्रेत लवकर पोहचून दुकानाची जागा सांभाळून थांबलेले होते. मात्र, आजचा दिवस या कुटुंबावर घाला घेऊन आला. सकाळी दहाच्या सुमारास अल्ताफ आणि इक्‍बाल असे दोघे भाऊ चालक वसीम पटेल याला घेऊन रामबोरीस (जि. धुळे) येथे यात्रेच्या बाजाराला जात असतानाच तुराट खेड्याजवळ अपघात होऊन दोघा भावंडांचा मृत्यू झाला. 

मणियार बिरादरीची धावपळ 
अल्ताफचे वडील ताहेर शेख हे पूर्वी जुने जळगावातील मणियार वाड्यातच वास्तव्याला होते. काही वर्षांपूर्वींच मासुमवाडीत राहण्यास आले आहेत. घटनेचे वृत्त कळताच मणियारवाड्यातील रहिवाश्‍यांसह मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांच्यासह इतर सदस्यांनी पारोळ्याला धाव घेतली. गुन्हा दाखल करून शवविच्छेदनानंतर दोघा भावंडांचे मृतदेह सायंकाळी पावणेआठला जळगावात दाखल झाले. वडिलांच्या अंत्यदर्शनप्रसंगी तिघे लेकरं सुन्नावस्थेत होती. मात्र, पार्थिव दारावर आल्यावर देहरा दाखवताना मुलांनी हंबरडा फोडला..अन्‌ उपस्थितांनीही हुंदके देत अश्रूंना वाट करून दिली. मासुमवाडीतील राहत्या घरून दोघा भावंडांच्या सोबतच अंत्ययात्रा निघून त्यांच्यावर दफनविधी करण्यात आला. 

बाळांतपणाची वेळ अन्‌.. 
अल्ताफ यांची पत्नी हीना यांना दोन मुले सुफियान, रेहान आणि एक मुलगी फातेमा असून, चौथ्यांदा त्या गर्भवती असल्याने खासगी रुग्णालयात दाखल होत्या. डॉक्‍टरांनी दुपारी दोनपर्यंत प्रसुतीची वेळ दिली असल्याने सकाळी पत्नीची भेट घेतल्यानंतर सायंकाळी लवकर येतो, असे सांगून निघालेले अल्ताफ आता या जगात नाहीत. रुग्णालयात एकट्या हिनाबी यांचे सीझर करण्याची वेळ आल्यावर डॉक्‍टरांनी नातेवाइकांना दूरध्वनीवरून माहिती दिली. दूरध्वनीवरूनच कुटुंबीयांनी तुम्हाला जे योग्य वाटेल तसे करावे, असे सांगितले व काही नातेवाइकांना रुग्णालयात रवाना करण्यात आले. सायंकाळी सिझेरियन करून त्या प्रसूत झाल्या. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com