जळगाव जिल्ह्यात पशुवैद्यकीय महाविद्यालयास मान्यता 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जून 2019

जळगाव : तत्कालीन महसूल व कृषिमंत्री एकनाथराव खडसेंनी जळगाव जिल्ह्यासाठी मंजूर केलेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयास शासनाने अखेर मान्यता दिली आहे. मुक्ताईनगर तालुक्‍यातील सालबर्डी येथे शंभर एकर जागेत हे महाविद्यालय उभे राहणार असून लवकरच त्याच्या कामास सुरवात होईल. जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. 

जळगाव : तत्कालीन महसूल व कृषिमंत्री एकनाथराव खडसेंनी जळगाव जिल्ह्यासाठी मंजूर केलेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयास शासनाने अखेर मान्यता दिली आहे. मुक्ताईनगर तालुक्‍यातील सालबर्डी येथे शंभर एकर जागेत हे महाविद्यालय उभे राहणार असून लवकरच त्याच्या कामास सुरवात होईल. जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. 
राज्यात 2014 मध्ये सत्तांतर होऊन भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर तत्कालीन मंत्री एकनाथराव खडसेंनी जळगाव जिल्ह्यासह खानदेशात मंजूर केलेल्या काही प्रकल्पांपैकी पशुवैद्यकीय महाविद्यालय हादेखील एक प्रकल्प होता. 2015मध्ये या महाविद्यालयाचा प्रस्ताव पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या (म्हापसू) अधिसभेत मंजूर करण्यात येऊन तो शासनाकडे पाठविण्यात आला होता. 

सालबर्डी ग्रा.पं.ने दिली जागा 
या महाविद्यालयासाठी 100 एकर जागा आवश्‍यक असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जागेचा शोध सुरु होता. मात्र, एवढी जागा न मिळाल्याने हा प्रस्ताव रखडला होता. शेवटी मुक्ताईनगर तालुक्‍यातील सालबर्डी ग्रामपंचायतीने स्वमालकीची 100 एकर जागा या महाविद्यालयासाठी उपलब्ध करुन दिली. 

शेतकऱ्यांसाठी सुविधा 
या शासकीय पशु महाविद्यालयामुळे जळगाव जिल्ह्यातील तसेच अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पशुवैद्यकीय चाचणी, पशुशल्यचिकित्सा, पशुधन विकास, वैरण विकास आदी सुविधा स्वस्त व शासकीय दरात उपलब्ध होणार आहेत. या महाविद्यालयात फिरती पशुवैद्यकीय वाहिका उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात, गोठ्यातच पशूंची चिकित्सा करणे शक्‍य होणार आहे. 

200 कोटींचा खर्च 
सालबर्डी ग्रामपंचायतीने शिवारात उपलब्ध करुन दिलेल्या 100 एकर जागेवर 200 कोटी रुपये खर्चून महाविद्यालय उभे राहणार आहे. या महाविद्यालयातून दरवर्षी 120 ते 180 विद्यार्थ्यांना पशुविज्ञान विषयातील पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेता येईल. 

महाराष्ट्रात तब्बल 40 वर्षांनंतर पशुवैद्यकीय महाविद्यालयास मान्यता मिळून ते सुरु होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांचे विशेष आभार. जिल्ह्याच्या दृष्टीने ही मोठी उपलब्धी आहे. 
- एकनाथराव खडसे, माजी मंत्री. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon pashuvaidkiy hospital khadse