खासगी रुग्णालयात बिलासाठी रूग्णाला डांबले  

खासगी रुग्णालयात बिलासाठी रूग्णाला डांबले  

धुळे  : अव्वाच्या सव्वा बिल आकारल्याबाबत तक्रार केल्याने येथील चाळीसगाव रोडवरील खासगी हॉस्पिटलच्या प्रशासनाने एका कोरोनाबाधित रुग्णासह नातेवाइकांना अपमानास्पद वागणूक दिली, बिलाच्या कारणावरून रुग्णाला डांबून ठेवले, अशी तक्रार जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांकडे झाली आहे. दरम्यान, संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेच्या पथकाने हॉस्पिटलमध्ये चौकशी केली. प्रथमदर्शनी संबंधित रुग्णाला जादा बिल दिल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. या प्रकरणात हॉस्पिटलला नोटीस बजावण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. 

शिवसेनेचे प्रवीण जेठेवाड यांनी जिल्हाधिकारी, आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की गणेश कानडे यांच्या आई शोभाबाई भरत कानडे या कोरोनाबाधित झाल्यानंतर त्यांना येथील चाळीसगाव रोडवरील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. ८ ते २० ऑगस्टदरम्यान त्यांच्यावर तेथे उपचार सुरू होता. मात्र, हॉस्पिटलने शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जादा बिल आकारल्याचे नातेवाइकांच्या लक्षात आले. (हॉस्पिटलमध्ये लावलेल्या दर फलकानुसार आयसीयू चार्ज दररोज २२०००, पीपीई किट दररोज ४५००, जनरल वॉर्ड दररोज ६०००, कोरोना मेंटेनन्स चार्ज दररोज २५००, चेस्ट थेरेपी दररोज १५०० व मेडिकल) श्री. कानडे यांना हॉस्पिटलने चार लाख ५२ हजार ५०० रुपये बिल आकारले होते. या बिलाबाबत आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली. याबाबत माहिती झाल्यानंतर हॉस्पिटलकडून रुग्णांच्या नातेवाइकांना अपमानास्पद वागणूक देण्यास सुरुवात केली. दरम्यान नियमाप्रमाणे बिल द्या, अशी मागणी रुग्णाचा नातेवाइकांनी हॉस्पिटल प्रशासनाकडे केली. 

मनपा पथकाची भेट 
दरम्यान, २१ ऑगस्टला सायंकाळी पाचपर्यंत रुग्णाला डिस्जार्ज देण्याचा तगादा नातेवाइकांनी लावल्यानंतरही हॉस्पिटलकडून जादा बिलाची मागणी होत होती. शेवटी या प्रकरणी आपण जिल्हाधिकारी, आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर महापालिकेचे साहाय्यक आयुक्त विनायक कोते व पथकाने लोकमान्य हॉस्पिटलमध्ये भेट देत चौकशी केली. श्री. कोते यांनी १७ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार भारत कानडे यांनी ते अदा केले. हॉस्पीटलचे ९७ हजार, मेडिकलचे एक लाख २० हजार, असे एकूण दोन लाख १७ हजार रुपये अदा केले. मात्र, मनपाचे पथक माघारी फिरल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने भरत कानडे (वय ६७), यशोदा कुंभारे यांना अपमानास्पद वागणूक दिली, असे तक्रारीत म्हटले आहे. जनतेची लूट होत असल्याने ऑडिट करावे, कानडे परिवाराची लेखी माफी मागावी अन्यथा गुन्हा दाखल करावा, हॉस्पिटलच्या कोविड सेंटरची मान्यता रद्द करावी आदी मागण्या श्री. जेठेवाड यांनी केल्या. 

तक्रारीच्या अनुषंगाने लोकमान्य हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट दिली. संबंधित रुग्णाला जादा बिल आकारल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. याबाबत सविस्तरपणे ऑडिट पथक चौकशी करेल. भेट देऊन कार्यवाही केल्यानंतर संबंधित रुग्णाला हॉस्पिटलकडून सोडण्यात आले. 
-विनायक कोते, साहाय्यक आयुक्त, मनपा धुळे. 


लोकमान्य हॉस्पिटलबाबत तक्रार आल्यानंतर पथक पाठविले होते. पथकाने आवश्‍यक कार्यवाही केली. याप्रकरणी संबंधित हॉस्पिटलला नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. 
- अजीज शेख, आयुक्त मनपा धुळे. 


संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com