पोलिसाची अडीच कोटी रुपयांत फसवणूक 

पोलिसाची अडीच कोटी रुपयांत फसवणूक 

जळगाव ः पतसंस्था, वनजमीन आणि अन्य घोटाळ्यांमध्ये पोलिस दलातील भूखंड घोटाळाही समोर आला आहे. यात पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले असून, सुमारे अडीच कोटींचा हा गैरव्यवहार असल्याचे सांगण्यात येत आहे. चार वर्षांनंतर आता महानिरीक्षकांना यात लक्ष घालण्याचे साकडे घालत गुन्हा नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक पदावर एस. जयकुमार कार्यरत असताना पोलिस दलात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी स्वस्त दरात हक्काचे घर बांधता यावे, या उद्देशाने पोलिस कल्याणमार्फत गृहप्रकल्प राबविण्यात येत असल्याचा वायरलेस जिल्ह्यात करण्यात आला होता. 

असा होता प्रकल्प 
सावखेडा शिवारात सव्वाचार एकर शेत जमीन घेऊन त्यावर कच्चे "ले-आउट' आखण्यात आले. पोलिस खात्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी चौकशीसाठी अक्षरश: उड्या पडल्या. तत्कालीन वेल्फेअर निरीक्षक दादाराव शिनगारे, कर्मचारी भाऊसाहेब गायकवाड यांनी जमीन जागा दाखवून 325 रुपये स्क्वेअर फूट दराने तब्बल 92 प्लॉट बुकिंग केले होते. वेल्फेअर कार्यालयातच बुकिंग काऊंटर उघडून कर्मचाऱ्यांनी तेथेच लाखो रुपये जमा करुन पावत्याही घेतल्या. अतिरिक्त दोन हजार रुपये सभासद शुल्कही घेण्यात आले. 

अशी झाली फसवणूक 
जवळपास सर्वच्या सर्व ले-आउट अडीच ते तीन कोटी रुपयांत विक्री झाले. लवकरच स्वत:चे घर होईल या अपेक्षेने सेवा निवृत्तीला आलेल्या कर्मचाऱ्यांसह काहींनी सोसायटी, जीपीएफ, पत्नीच्या अंगावरील दागिने विकून पैसा उभा करीत गुंतवणूक केली होती. पैसे देऊन तब्बल पाच वर्षे उलटूनही या कर्मचाऱ्यांना त्यांचा भूखंड मिळू शकलेला नाही. परिणामी फसवणूक झालेल्या 62 कर्मचाऱ्यांची नुकतीच बैठक होऊन या प्रकरणी अंतत: पोलिस महानिरीक्षकांच्या कानावर विषय घालून गुन्हा दाखल करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे. 

पहिले पाढे पंचावन्न 
तत्कालीन पोलिस अधीक्षक एस.जयकुमार यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या या प्रकल्पाचे नाव देखील "जयनगर' असे ठेवण्यात आले. जिल्ह्यातून बदलून गेल्यावर एकदाही जयकुमार यांनी या विषयाकडे लक्ष दिले नसून ज्याच्या हातात पैसा दिला ते पोलिस निरीक्षक दादाराव शिनगारे औरंगाबाद सिटी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. अधीक्षक बदलले की, गुंतवणूक केलेले कर्मचारी त्यांच्याकडे गाऱ्हाणे घेऊन जातात. प्रकरण समजून घेण्यासाठी शिनगारेंना नवीन एसपी बोलावतात, चर्चा होते.. परत "पहिले पाढे पंचावन्न', असा चार- पाच वर्षांचा कालावधी लोटला आहे. 

अशी फसवणूक 
सावखेडा शिवारात सव्वाचार एकर (गट क्र. 98) घेतलेल्या शेतजमिनीवर 92 प्लॉट पाडण्यात आले, त्यासाठी 63 कर्मचाऱ्यांनी प्रति चौ. फू. 325 रुपये दराने क्षमतेप्रमाणे प्लॉट नोंदवून तब्बल अडीच कोटी रुपये गोळा करून दिले आहेत. कर्मचाऱ्यांचा पैसा घेऊन मूळ मालक दीपक गोपालदास मुंदडे याच्याकडून सातबारा उतारा दादाराव सखाराम शिनगारे यांच्या नावे वर्ग करण्यात आला आहे. त्यावर अद्याप कुठलीही सोसायटी तयार झालेली नसून "एस.पी.' जयकुमार आणि निरीक्षक शिनगारे यांनी संगनमताने सरकारी यंत्रणा कार्यालयाचा दुरुपयोग करून खासगी प्लॉट खरेदी-विक्रीचा धंदा केल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. 

आकडेवारी अशी... 
शहरापासून : 20 कि.मी. 
एकूण भूखंड : 92 
एकूण सभासद : 63 
सभासद शुल्क : 2 हजार (प्रत्येकी) 
भूखंड दर : 325 रुपये प्रति चौ. फू. 
संकलित रक्कम : 2.50 कोटी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com