शाळांमध्ये पोहोचणार पोस्ट खाते! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 डिसेंबर 2019

टपाल खात्यात मुलीच्या नावाने खाते उघडून वर्षाला किमान एक हजार रुपये गुंतवणूक करणे सर्वांना सोयीचे ठरत असल्याने योजनेस प्रतिसाद मिळतो. जळगाव विभागात गेल्या पाच वर्षांत 21 हजार मुलींच्या नावाने खाती उघडली गेली.

जळगाव : भारतीय डाक विभागाने मुलींच्या नावाने गुंतवणूक होण्याच्या उद्देशाने "सुकन्या समृद्धी योजना' सुरू केली आहे. या योजनेला जळगाव विभागात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तरीही सुकन्या योजनेत अद्याप खाते न उघडणाऱ्यांसाठी आता "बालिका शक्‍ती सुकन्या'अभियान राबविण्यात येत असून, त्यासाठी पोस्ट विभाग शाळांमध्ये पोहोचणार आहे. 
भारतीय डाक विभाग इंटरनेट, मोबाईलच्या काळात टिकून राहणे व ग्राहकांना टपाल खात्याशी जोडून ठेवण्याच्या उद्देशाने नवनवीन योजना राबवत आहे. त्यानुसारच मुलीच्या नावाने गुंतवणूक करता यावी, या उद्देशाने 3 डिसेंबर 2014 पासून सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. ही योजना जळगाव विभागातील सर्व पोस्ट कार्यालयांत उपलब्ध केल्यानंतर सुरवातीला याला चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु सध्याच्या परिस्थितीत प्रतिसाद अल्प झाल्याने पोस्ट विभागाने बालिका शक्‍ती सुकन्या अभियान राबविण्यास सुरवात केली आहे. 

संबंधीत बातम्या > अन्‌ घरांवर झळकणार मुलींच्या नावाच्या पाट्या

महिनाभर अभियान 
भारतीय डाक जळगाव विभागामार्फत 9 डिसेंबर ते 8 जानेवारी 2020 असे महिनाभर बालिका शक्‍ती सुकन्या अभियान राबविण्यात येत आहे. या कालावधीत प्राथमिक शाळांमध्ये जाऊन दहा वर्ष वयापर्यंतच्या मुलींची ज्यांची सुकन्या योजनेत अद्याप खाते उघडण्यात आलेली नाही. अशा मुलींची खाते उघडण्याबाबत शिक्षक, विद्यार्थिनी व पालकांना माहिती दिली जाणार आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत जळगाव शहरातील पंधरा शाळांमध्ये भेटी देवून खाती उघडण्यात आली आहेत. हे अभियान असेच महिनाभर सुरू राहणार आहे. 

नक्‍की पहा > दोन मुले तरीही झाली निराधार...शेवटी हिनेच दिला आधार

21 हजार खाते उघडले 
टपाल विभागातर्फे डिसेंबर 2014 पासून सुकन्या योजना सुरू केली. जिल्ह्यात जळगावसह चाळीसगाव विभागांतर्गत येणाऱ्या सर्व टपाल कार्यालयांत सुकन्या समृद्धी योजना उपलब्ध आहे. टपाल खात्यात मुलीच्या नावाने खाते उघडून वर्षाला किमान एक हजार रुपये गुंतवणूक करणे सर्वांना सोयीचे ठरत असल्याने योजनेस प्रतिसाद मिळतो. जळगाव विभागात गेल्या पाच वर्षांत 21 हजार मुलींच्या नावाने खाती उघडली गेली. अभियानाच्या माध्यमातून हा आकडा वाढविण्याचा प्रयत्न टपाल विभाग करीत आहे. 

व्याजदर 9.2 टक्‍के 
सुकन्या समृद्धी योजनेत 2 डिसेंबर 2003 नंतर जन्मलेल्या मुलीच्या नावाने खाते उघडता येईल. खाते उघडल्यानंतर खात्यातील रकमेवर टपाल खात्याने सुरवातीला 9.1 टक्‍के व्याजदर दिला. परंतु, यात बदल करून खात्यात ठेवलेल्या रकमेवरील व्याजदर आता 9.2 टक्‍के केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon post office in school suknya yojna