पुण्याला जाणारे दोन हजार प्रवासी वाऱ्यावर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

जळगाव ः वर्षभरापासून ठप्प झालेले जळगाव- औरंगाबाद महामार्ग चौपदरीकरणाचे काम, त्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास, बसचे नुकसान आणि रात्रीच्या वेळी दरोड्याची भीती यामुळे जळगाव-पुणे व जळगाव- मुंबई या मार्गावर जाणाऱ्या बसचा मंगळवारपासून (ता.24) तीन दिवसांचा बंद पुकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे पुण्याला जळगाव जिल्ह्यातून दररोज दीड ते दोन हजार प्रवासी जातात, ते या संपामुळे वाऱ्यावर आहेत. 

जळगाव ः वर्षभरापासून ठप्प झालेले जळगाव- औरंगाबाद महामार्ग चौपदरीकरणाचे काम, त्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास, बसचे नुकसान आणि रात्रीच्या वेळी दरोड्याची भीती यामुळे जळगाव-पुणे व जळगाव- मुंबई या मार्गावर जाणाऱ्या बसचा मंगळवारपासून (ता.24) तीन दिवसांचा बंद पुकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे पुण्याला जळगाव जिल्ह्यातून दररोज दीड ते दोन हजार प्रवासी जातात, ते या संपामुळे वाऱ्यावर आहेत. 

गेल्या दोन वर्षांपूर्वी जळगाव-औरंगाबाद महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मंजूर झाले. त्यानंतर निविदा प्रक्रिया होऊन काही सुरूही झाले. औरंगाबादपासून हे काम सुरू करून दोन्ही बाजूंनी रस्ता खोदून ठेवण्यात आला. मात्र, आता वर्षभरापासून हे काम ठप्प असून, ठेकेदार काम सोडून पळून गेला आहे. त्यामुळे हा रस्ता प्रचंड खराब झाला असून, या मार्गाने जाणाऱ्या वाहनांचे प्रचंड नुकसान होत आहे. 

दररोज शंभरावर बस 
जळगावहून औरंगाबाद, पुण्याकडे दररोज शंभरपेक्षा अधिक प्रवासी वाहने जात असतात. यात खासगी बसची संख्या जवळपास 70पेक्षा अधिक आहे. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनांच्या देखभाल- दुरुस्तीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सहा महिन्यांपासून खासगी बस धुळेमार्गे जात असल्याने इंधनाचा खर्चही अधिक वाढला आहे. शिवाय, या रस्त्याने वाहने हळू चालवावी लागत असल्याने दरोड्याचीही भीती असते. या प्रकाराच्या निषेधार्थ जळगाव-पुणे बसमालकांनी मंगळवारपासून (24 सप्टेंबर) तीन दिवस संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुणे, मुंबई बस बंद 
जळगाव खासगी (लक्‍झरी) बसमालक तथा चालकांतर्फे 24 ते 26 सप्टेंबरदरम्यान जळगाव ते पुणे व जळगाव-मुंबई तर 25 ते 27 सप्टेंबरदरम्यान पुणे- जळगाव व मुंबई ते जळगाव बस बंद ठेवून संप पुकारण्यात आला आहे. 

...या आहेत मागण्या 
- औरंगाबाद रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला वेळ निश्‍चित करून द्यावी. 
- रस्त्यामुळे संथगतीने बस चालत असल्याने बसवर दरोड्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पोलिसांची गस्त वाढविणे. 
- रस्त्याच्या दुरवस्थेमुळे टोल माफ करावा. 
- गाडीच्या देखभाल-दुरुस्तीसाठी प्रचंड खर्च येत असल्याने खासगी बसचालकांच्या कर्जावरील हप्त्यांचे व्याज माफ करावे. 
- शहरातील "नो एन्ट्री'ची मर्यादा सकाळी 7 ऐवजी 9 करावी. 

एसटीची बुकिंग नाही 
खासगी बसचालकांच्या संपामुळे विशेष करून जळगाव- पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. पुण्याला दररोज 60-70 खासगी बसद्वारे दीड-दोन हजार प्रवासी जातात. मात्र, संप जाहीर होऊनही एसटीची बुकिंग मात्र वाढलेली नाही. एसटीतर्फे रात्री साडेनऊच्या स्लिपर कोच बसचे आरक्षणही पूर्ण झालेले नाही. ऐनवेळी प्रवासीसंख्या वाढल्यास पुण्यासाठी जादा बस सोडण्यात येतील, असे एसटी महामंडळातर्फे सांगण्यात आले. 

जळगाव- औरंगाबाद महामार्ग चौपदरीकरणाचे काम तातडीने पुन्हा सुरू करून ते मर्यादित कालावधीत पूर्ण करावे, अशी आमची प्रमुख मागणी आहे. प्रवाशांची गैरसोय होत असली तरी या संपाशिवाय पर्याय नव्हता म्हणून हा संप पुकारण्यात आला आहे. 
- मुकेश बेदमुथा अध्यक्ष, जळगाव जिल्हा खासगी ट्रॅव्हल्स असोसिएशन. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon praivate travals strike