सैन्यातील अधिकाऱ्याचा रेल्वेत चटका लावणारा मृत्यू 

सैन्यातील अधिकाऱ्याचा रेल्वेत चटका लावणारा मृत्यू 

भुसावळ ः आपल्या कुटुंबियांसह रेल्वेतून प्रवास करणाऱ्या सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा (कर्नल) अचानक मृत्यू होतो आणि सुरू होते धावपळ. त्यात पोलिस व महसूल कर्मचाऱ्यांनी दाखविलेले माणुसकीचे दर्शन अचंबित करणारे होते. मानवी जीवन क्षणभंगुर आणि अस्थिर आहे याची साक्ष जागोजागी अनेक घटना आणि प्रसंगांतून येत असते. कुणाचा जन्म आणि मृत्यू कुठे आणि कसा, कधी होईल हे सांगता येत नाही. मात्र, संकटावेळी माणुसकीचे दर्शन घडते. 
आज दुपारी दोनच्या सुमारास येथील रेल्वेस्थानकात घडलेली घटना वरील सत्याची आठवण करून देणारी आहे. भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकारी असलेले लेफ्टनन कर्नल मुनप्पा पानंडा (वय 55) आपल्या पत्नी व मुलीसह भोपाळ ते बेंगळुरू असा कर्नाटक एक्‍स्प्रेसने (ट्रेन नं. 12628) एसी एच एस-1 या वातानुकूलित डब्यातून प्रवास करीत होते. या प्रवासादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका (प्राथमिक अंदाज) आल्याने त्यांचा मृत्यू झाला. या रेल्वेला बऱ्हाणपूरनंतर भुसावळलाच थांबा असल्याने त्यांना भुसावळ रेल्वेस्थानकावर उतरविले गेले. रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्यांच्यावर उपचाराचा प्रयत्नही झाला. परंतु मृत्यू झाल्याचे लक्षात येताच पुढील सोपस्काराचे प्रयत्न सुरू झाले. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, अप्पर निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना बातमी कळताच त्यांनी तातडीने त्या परिवाराला मदत व पुढील कार्यवाहीसाठी भुसावळ येथील महसूल कर्मचारी व सैन्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्‍यक त्या सूचना दिल्या. नियमाप्रमाणे शवविच्छेदन करणे आवश्‍यक होते. भुसावळला सोय नसल्याने मृतदेह वरणगावला नेण्याचे ठरले. तेथे उपस्थित प्रा. डॉ. जतिन मेढे यांनी तेथे संपर्क साधला. मात्र, सैन्यातील अधिकाऱ्यांनी जळगावला शवविच्छेदन करणे योग्य ठरेल, असे सांगितल्यावर जळगावला मृतदेह हलविण्यात आला. अशा घटनांत मदतीसाठी पुढे असलेले जि. प. कर्मचारी महासघाचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत तायडे, किन्हीचे (ता. भुसावळ) तलाठी मिलिंद देवरे, अमोल पाटील, आरपीडीचे ब्रिगेडिअर सुनील कदम, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, जीआरपीचे पोलीस निरीक्षक दिलीप गढरी, पोलिस शिपाई डोंगरदिवे या सर्वांचे मदतीचे दर्शन मानवतेचे आणि देशभक्तीच्या भावनांच्या कृतींचे दर्शन घडविणारे होते. 
 
जळगावहून साहेबांचा फोन निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांना आला, त्यावेळी मी कामानिमित्ताने तहसील कार्यालयात आलो होतो. घटना कळताच त्यांच्यासमवेत रेल्वेस्थानकावर गेलो. माणुसकीच्या नात्याने सर्व मदत आमच्या टीमने केली. या घटनेत सैनिकाची पत्नी व मुलीने दाखविलेला संयम कौतुकास्पद होता. 
- प्रशांत तायडे, ग्रामसेवक, जिल्हा सरचिटणीस, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com