उधना-जळगाव दुहेरी रेल्वेलाइनचे काम पूर्ण; उद्‌घाटनास "ब्रेक' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

जळगाव : पश्‍चिम रेल्वेमार्गावरील उधना- जळगाव टप्प्यातील रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या लाइनवर रेल्वेची चाचणीही पूर्ण झाली असून, हा मार्ग उद्‌घाटनासाठी सज्ज आहे. सध्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची आचारसंहिता असल्याने ती संपल्यानंतर या मार्गाचे उद्‌घाटन होणार आहे. 
खानदेश आणि गुजरातला जोडणाऱ्या पश्‍चिम रेल्वेमार्गावरील उधना ते जळगाव या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे महत्त्वाकांक्षी काम गेल्या आठ वर्षांपासून प्रगतिपथावर होते. 2010 मध्ये तत्कालीन सरकारने या कामास मंजुरी दिल्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यात हे काम पूर्ण करण्यात आले. 

2800 कोटी खर्च 
कामास मंजुरी मिळाली तेव्हा त्याची मूळ किंमत 735 कोटी होती. 206 किलोमीटर दुहेरी रेल्वेमार्गाचे हे काम पूर्ण होता होता त्यावर जवळपास 2800 कोटी रुपये खर्च झाले आहेत. अनेक वर्षांपासून या मार्गावर एकेरी लाइन होती, सुरवातीला कोळसा व डिझेल इंजिनावर चालणाऱ्या गाड्या या मार्गावर धावायच्या. मात्र गेल्या दोन दशकांत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आणि त्यानंतर महत्त्वाचे दुहेरीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. 

चाचणीही यशस्वी 
नंदुरबार-दोंडाईचा स्थानकादरम्यानच्या 31 किलोमीटर कामाचा टप्पा काही कारणास्तव बाकी होते, तोदेखील पूर्ण झाले असून संपूर्ण दुहेरी लाइनवरील विद्युतीकरणही पूर्ण झाले आहे. शिवाय, या मार्गावरील सहा महत्त्वपूर्ण स्थानकेही सज्ज करण्यात आली आहेत. या संपूर्ण मार्गावर रेल्वेगाडीची चाचणी झाली असून, ती यशस्वी ठरली आहे. रेल्वेच्या तांत्रिक निरीक्षकांचे रेल्वे वाहतुकीबाबतचे मान्यतापत्र आठवडाभरात सर्व स्थानकांना मिळणार आहे. 

वेळेची होणार बचत 

गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गाच्या दुहेरीकरणाची मागणी होती. भुसावळ- सुरत मार्गावर प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांना क्रॉसिंगसाठी तासन्‌तास खोळंबून राहावे लागायचे. दुहेरीकरणाच्या कामामुळे क्रॉसिंगसाठी द्यावा लागणारा वेळ वाचणार असून, त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. सध्या या मार्गावर दिवसभरात 14 प्रवासी व 28 मालवाहतूक गाड्यांचे आवागमन होते. 
 
रेल्वे राज्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन 
सध्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता आहे. त्यामुळे ही आचारसंहिता संपल्यानंतर रेल्वे राज्यमंत्र्यांच्या हस्ते या दुहेरी रेल्वेमार्गाचे उद्‌घाटन होणार आहे. 

गेल्या सात-आठ वर्षांत सातत्याने पाठपुरावा करून निधी मिळवत हे काम पूर्ण करून घेण्यात आले. दुहेरीकरणामुळे प्रवासी व मालवाहतूक गाड्यांच्या वेळेची बचत होणार आहे. पुढील महिन्यात मार्गाच्या उद्‌घाटनाचे नियोजन करण्यात येईल. 
- डॉ. हीना गावित, खासदार, नंदुरबार. 
 
दृष्टिक्षेपात उधना- जळगाव रेल्वेमार्ग 
एकूण अंतर : 206 किलोमीटर 
महत्त्वाची स्थानके : 06 
कामाची मूळ किंमत : 735 कोटी 
पूर्ण होण्यापर्यंतचा खर्च : 2800 कोटी 
गाड्या प्रतिदिन वाहतूक : 42 

Web Title: marathi news jalgaon railway udhana line