पावसाळ्यातही वाळूचा बेसुमार उपसा? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

जळगाव ः पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने सर्वच वाळू ठेके बंद असतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने गिरणा नदीला पूर आलेला नाही. यामुळे गिरणा नदीपात्रातील सर्वच ठिकाणांवरील ठेक्‍यांतून वाळू उपसा सुरूच आहे. वाळूमाफियांनी आपल्याला ठरवून दिलेल्या क्षेत्रातील वाळूचा उपसा केलाच आहे, त्याशिवाय इतर ठिकाणांवरील वाळूचा उपसा करून गिरणा नदीचे स्वरूपच पालटून टाकले असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. याला महसूल प्रशासन जबाबदार असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. 

शुक्रवारी (17 ऑगस्ट) आव्हाणी (ता. धरणगाव) येथे गिरणा नदीपात्राजवळ वाळू डंपरने (एमएच 19- झेड 7590) गुरे चारणाऱ्या पुंडलिक पाटील यांना धडक देत चिरडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अद्याप आव्हाणी परिसरातील नागरिकांच्या वाळू उपशाबाबत संतप्त भावना आहेत. 
आव्हाणी परिसरातील गिरणा नदीपात्रात वाळूमाफियांनी वेगळा पूल तयार केला आहे. नदीपात्रात वाळूमाफिया पूल बांधतात आणि ते महसूल प्रशासनाला कसे माहीत पडत नाही, याचे आश्‍चर्य ग्रामस्थांना आहे. या पुलावरून अवैधरीत्या रात्रंदिवस सर्रास अवैधरीत्या वाळू वाहतूक सुरू आहे. याला हप्तेखोरी कारणीभूत असल्याचा आरोप आहे. 
डोमगावचा वाळू ठेकेदार आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुफनगरी या भागातूनही वाळू उपसा होत आहे. यामुळे नदीपात्रात वीस-वीस फूट खोल खड्डे तयार झालेले आहेत. नदीला पूर येऊन त्यात कोणी या खड्ड्यामध्ये अडकल्यास त्याला जबाबदार कोण राहील ? असा प्रश्‍न ग्रामस्थांचा आहे. नदीपात्रात खोल खड्डे करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी होत आहे. 

दोन दिवसांनंतरही दखल नाही 
शुक्रवारी (17 ऑगस्ट) आव्हाणी येथे गिरणा नदीपात्राजवळ वाळूच्या डंपरने पुंडलिक पाटील यांना चिरडले. नागरिकांनी डंपर पेटवूनही दिला. मात्र, अद्याप घटनास्थळी महसूल विभागाच्या कोणाही अधिकाऱ्याने भेट दिलेली नाही. यावरून महसूल प्रशासन वाळूमाफियांच्या किती पाठीशी आहे, हे बोलके उदाहरण आहे. 

मोजणीस केव्हा सुरू होणार 
धरणगावचे तहसीलदार इंद्रजित राजपूत यांनी ठेकेदाराने केलेल्या वाळू उपशाची चौकशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने करू, असे सांगितले होते. ती मोजणी केव्हा सुरू होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. 

जिल्ह्यातील बहुतांश वाळूठेके मुदत संपल्याने बंद आहेत. दोनगावच्या (ता. धरणगाव) ठेक्‍यांची मुदत सप्टेंबरअखेर आहे, तोपर्यंत तो सुरू राहील. त्यातून वाळू उपसा होत आहे. पूल बांधल्याबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
- दीपक चव्हाण, जिल्हा गौण खनिज अधिकारी

Web Title: marathi news jalgaon rain valu upsa