राजधानी एक्स्प्रेस चार दिवस धावणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

मुक्‍ताईनगर : प्रीमियम राजधानी एक्सप्रेस गाडीला मुंबईसह जळगाव आणि भोपाळ येथील प्रवाशांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ होण्याची मागणी प्रवाशांनी खासदार रक्षा खडसे यांच्याकडे केली होती. यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. याची दखल घेत, रेल्वे प्रशासनाने या गाडीच्या चार फेऱ्यांना मंजुरी दिली आहे. 

जानेवारी महिन्यापासून मुंबई ते दिल्ली दरम्यान राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती. आठवड्यातून दोन दिवस ती धावत असे. मुंबई ते दिल्ली हे अंतर २० तासांत ही गाडी पार करीत असे. मात्र, पूल-पुश तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्यानंतर हे अंतर १६ तासांवर आले होते. परिणामी कमी खर्चात आणि कमी वेळेत दिल्ली गाठणे मुंबईकरांना सहज शक्य झाले होते. याशिवाय नाशिक, जळगाव, भोपाळ येथूनही या गाडीला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या मार्गावर राजधानी एक्स्प्रेसच्या फेऱ्यांत वाढ होण्याची गरज निर्माण झाली होती. पश्चिम रेल्वेकडून नुकताच २० कोचचा रॅक मध्य रेल्वेला उपलब्ध झाल्याने राजधानीच्या फेऱ्यांत वाढ होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आतापर्यंत एकच रॅक उपलब्ध असल्याने केवळ दोन फेऱ्या होऊ शकत होत्या. मागणी असूनही फेऱ्या वाढविणे शक्य नव्हते. मात्र, आता दुसरा रॅक उपलब्ध झाल्याने चार फेऱ्या करणे शक्य होणार आहे. पश्चिम रेल्वेकडून मिळालेल्या रॅकमध्ये पूल-पुश तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्यक बदल करण्याची प्रक्रिया मध्य रेल्वेकडून केली जाणार आहे. या कामास एक आठवड्याचा कालावधी लागणार असल्याने साधारणतः पंधरा दिवसांनंतर ही गाडी आठवड्यातून चार दिवस प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. आता चार दिवस ती उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांची आणखी सोय होणार आहे. या गाडीच्या वाढलेल्या फेऱ्यांनाही मोठा प्रतिसाद मिळेल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon rajdhani express 4 day