"राष्ट्रवादी'चा गजर, देवकरांवरच नजर! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

जळगाव : लोकसभा मतदार संघात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेतर्फे स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरण्यास तयार आहेत. मात्र "युती'चे काय होणार याकडेच, त्यांचे लक्ष आहे. "आघाडी'त ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे जाणार, हे निश्‍चित आहे. पक्षातर्फे उमेदवारीत ऍड. उज्ज्वल निकम, अनिल भाईदास पाटील ही नावे चर्चेत आहेत. मात्र, पक्षाच्या नेत्यांची खरी नजर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावरच आहे. त्यामुळे या मतदार संघातील उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष आहे. 

जळगाव : लोकसभा मतदार संघात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेतर्फे स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरण्यास तयार आहेत. मात्र "युती'चे काय होणार याकडेच, त्यांचे लक्ष आहे. "आघाडी'त ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे जाणार, हे निश्‍चित आहे. पक्षातर्फे उमेदवारीत ऍड. उज्ज्वल निकम, अनिल भाईदास पाटील ही नावे चर्चेत आहेत. मात्र, पक्षाच्या नेत्यांची खरी नजर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावरच आहे. त्यामुळे या मतदार संघातील उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष आहे. 
जळगाव लोकसभा मतदार संघ आजच्या स्थितीत भाजप व शिवसेना युतीचा बालेकिल्ला म्हटला जातो. दोन्ही पक्षातर्फे संयुक्तपणे काम होत असल्याने लोकसभा निवडणुकीत युतीला यश मिळत असून, भाजपचा उमेदवार निवडून येत आहे. यावेळी मात्र या मतदार संघातून शिवसेनेने उमेदवार उभा करण्यासाठी कंबर कसली आहे. पाचोऱ्याचे माजी आमदार आर.ओ.पाटील यांची उमेदवारी पक्षातर्फे निश्‍चित आहे. युती झाली तरी हा मतदार संघ सेना घेणार, असा दावाही पक्षातर्फे करण्यात आला आहे. मात्र, त्याच वेळी भाजप हा मतदार संघ सोडणार नाही, याचीही खात्री आहे. पक्षातर्फे विद्यमान खासदार ए. टी. पाटील व जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे नाव चर्चेत आहे. त्या शिवाय, विद्यमान आमदार स्मिता वाघ याही उमेदवारीच्या स्पर्धेत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे "युती' झाल्यानंतरच सेना-भाजपचे उमेदवाराचे निश्‍चित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
खासदारांची उमेदवारी वाध्यांत? 
जळगाव मतदार संघातील पक्षाचे खासदार ए. टी. पाटील यांची उमेदवारीच वांध्यात असल्याचे पक्षाच्या अंतर्गत गोटातून सांगण्यात येत आहे. पक्षातर्फे अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले होते. पाटील यांचा परफॉर्मन्सही "डाऊन' असल्याचा अहवाल आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत पक्षाच्या केंद्रीय गटातर्फे शंका व्यक्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या मतदारसंघातून भाजप नवीन उमेदवार देणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, पाटील यांच्यातर्फे मात्र हे सर्वच फोल असल्याचे सांगण्यात येत असून, पक्षातर्फे आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे भाजपतही उमेदवारीची अनिश्‍चितताच असल्याचे दिसून येत आहे. मात्र, खासदार ए. टी. पाटील यांनी आपल्या कामाची गती वाढविली आहे. शेवटच्या षटकात ते जोरदार खेळी करीत आहेत. त्यामुळे आपले लक्ष "कमळा'कडे ठेवून ते "हाता'तील "घडयाळा'ची वेळही ऐनवेळी साधू शकतील, असेही सांगितले जात आहे. 

"राष्ट्रवादी'चे देवकरच "लक्ष्य' 
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जागा वाटपात जळगाव मतदार संघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. त्यामुळे पक्षातर्फे उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे. पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, अमळनेर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल भाईदास पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. पक्षाच्या मुंबईतील बैठकीतही या नावांचा ऊहापोह करण्यात आला. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाची उमेदवारीसाठी माजी गुलाबराव देवकर यांच्यावरच नजर असल्याचे सांगितले जात आहे. पक्षातर्फे विजयी उमेदवाराचे गणित मांडले जात असून, त्यात देवकर हे शंभर टक्के फिट्ट बसत आहेत. ग्रामीण भागात त्यांचा संपर्क आहेच, परंतु शहरातही त्यांना चांगला प्रतिसाद मिळणार असल्याचे पक्षातर्फे घेण्यात आलेल्या माहितीत दिसून आले आहे. त्यामुळेच मुंबईतील बैठकीत पक्षाच्या नेत्यांनी देवकर यांना लोकसभा लढण्यास सज्ज राहण्यास सांगितल्याची अंतर्गत माहिती प्राप्त झाली आहे. 
 

Web Title: marathi news jalgaon rashtrwadi devkar