esakal | जळगाव जिल्हा रेडझोनच्या एका पावलावर; नवे तीन पॉझिटीव्ह 

बोलून बातमी शोधा

corona positive

भुसावळातील 1, अमळनेरमधील 1 तर मलकापूर येथील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 14 वर आली असून जिल्हा रेडझोनच्या उंबरठ्यावर येवून ठेपला आहे. 

जळगाव जिल्हा रेडझोनच्या एका पावलावर; नवे तीन पॉझिटीव्ह 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. धुळे येथे पाठविण्यात आलेल्या संशयीत रुग्णांचे अहवाल आज दुपारी प्राप्त झाले असून जिल्ह्यात पुन्हा 3 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यामध्ये भुसावळातील 1, अमळनेरमधील 1 तर मलकापूर येथील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 14 वर आली असून जिल्हा रेडझोनच्या उंबरठ्यावर येवून ठेपला आहे. 

संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजविला असून संपूर्ण राज्यात देखील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील अमळनेर तालुक्‍यातील एकाच कुटूंबातील 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 11 वर पोहचला होता. आज धुळे येथे काही संशयीत रुग्णांचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील 3 रुग्णांचे अहवाल आज दुपारी प्राप्त झाले असून यामध्ये अमळनेर तालुक्‍यातील 43 वर्षीय पुरुष, भुसावळ येथील 43 वर्षीय महिला व मलकापूर येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. 

अमळनेरकरांना धोक्‍याची घंटा 
अमळनेर तालुक्‍यात शुक्रवारी एकाच कुटूंबातील पाच रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला होता. या सर्व रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहे. आज पुन्हा अमळनेर तालुक्‍यातील शाहआलम नगरातील 43 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून अमळनेर तालुक्‍यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 11 वर पोहचली असल्याने दररोज कोरोनाग्रस्तांमध्ये होणाऱ्या वाढीमूळे अमळनेरकरांसाठी ही धोक्‍याची घंटा आहे. 

भुसावळात आढळला पहिला कोरोनाचा रुग्ण 
जळगाव जिल्ह्यातील भुसावळातील समता नगरातील 43 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भुसावळात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने भुसावातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा हादरुन गेली आहे. तसेच मलकापुर येथील 65 वर्षीय महिलेचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा यंत्रणेला चांगला हादरा बसला आहे. 

जिल्हा रेड झोनच्या उंबरठ्यावर 
सुरुवातील शहरात कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. यापैकी एकाचा मृत्यू झाला होता तर दुसरा रुग्णाने कोरोनावर मात करुन तो बरा झाला आहे. त्यामूळे जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये जाणार होता. मात्र गेल्या चार दिवसांपूर्वी अमळनेर तालुक्‍यातील तीन जणांना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर यामध्ये दररोज वाढ होत असून आता अमळनेर तालुक्‍यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 10 वर येवून ठेपली आहे. तसेच जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ही 14 वर येवून ठेपली आहे. रेड झोनमध्ये जाण्यासाठी केवळ एकच अहवाल शिल्लक राहिला असल्याने जळगाव जिल्हा रेड झोनच्या उंबरठ्यावर येवून ठेपला आहे.