माजी सैनिकाच्या पत्नीची कर्जासाठी फरफट! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

जळगाव ः सैन्यात काम केलेल्या जवानाकडे देश मोठ्या गौरवाने पाहतो. नागरिकांना त्या सैनिकाचा हेवा वाटतो. मात्र, बॅंकेचे अधिकारी जेव्हा माजी सैनिकाच्या पत्नीला "मुद्रा लोन' देण्याबाबत टाळाटाळ करीत असेल, तर मात्र सर्वसामान्यांमध्ये संताप व्यक्त होतो. अर्थात, गरजवंतांना "मुद्रा कर्ज' सहजतेने मिळत नाही, अशा अनेक तक्रारी समोर येत असताना एका सैनिकाच्या पत्नीचीही या कर्जासाठी फरफट झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 

केंद्रीय राखीव पोलिस दलात तीस वर्षे नोकरी केलेले विजय सपकाळे पाळधी (ता. धरणगाव) येथे राहतात. नोकरीनंतर घराचा उदरनिर्वाह चालावा म्हणून त्यांनी "प्रायमिनिस्टर इम्प्लायमेंट जनरेशन प्रोग्रॅम'अंतर्गत त्यांची पत्नी ललिता विजय सपकाळे यांच्या नावाने मिनरल वॉटरची निर्मिती पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या धरणगाव येथील शाखेत जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून पंधरा लाखांचे कर्ज प्रकरण तीन महिन्यांपूर्वी टाकले. 

तीन वेळा बदलला अहवाल 
त्यांना बॅंकेच्या व्यवस्थापकांकडून तब्बल तीन वेळा प्रोजेक्‍ट रिपोर्ट बदलविण्यास सांगून कर्ज देण्याबाबत टाळाटाळ करण्यात आली. अनेक वेळा विविध कागदपत्रांसाठी हेलपाटे मारायला लावले आहेत. तीन वेळा प्रोजेक्‍ट रिपोर्ट बदलवूनदेखील अद्याप त्यांना कर्ज न देता, कर्ज प्रकरणच रद्द करण्यात आले आहे. माजी सैनिकाच्या पत्नीला उदरनिर्वाह करण्यासाठी कोणतेही कारण न देता बॅंक कर्ज नाकारू शकते, हे दुर्दैव आहे. जिल्हा प्रशासन, लीड बॅंकेच्या महाव्यवस्थापकांनी याकडे लक्ष घालून न्याय मिळवून देण्याची मागणी होत आहे. 
 
एका माजी सैनिकास बॅंका उदरनिर्वाह करण्यासाठी उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज देत नसतील, तर आम्ही कोणाकडे दाद मागायची? अनेक वेळा मी, माझ्या पत्नीने पाळधीच्या सेंट्रल बॅंकेच्या शाखेत कर्ज मिळण्यासाठी पायपीट केली. मात्र, उपयोग झाला नाही. 
- विजय सपकाळे 

Web Title: marathi news jalgaon retaird sainik wife loan