अस्थिरता संपून सोन्याचे दर स्थिर होणार : अमित मोडक 

अमोल भट
Friday, 24 January 2020

सद्य:स्थितीत जागतिक मंदी, अमेरिका-इराणमधील संघर्ष, अमेरिका-चीनमधील व्यापारयुद्ध या घटकांसह अस्थिर राजकीय व व्यावसायिक वातावरणाचा परिणाम सोन्या-चांदीचे दर प्रभावित करीत आहे. या सर्व स्थितीबाबत श्री. मोडक यांच्याशी त्यांच्या जळगाव भेटीत संवाद साधला असता त्यांनी "सकाळ' प्रतिनिधीशी बातचीत केली. 

अमेरिका व इराण यांच्यात सुरू झालेला नवा संघर्ष सोन्याच्या भाववाढीस कारणीभूत ठरला आहे. गेल्या कालावधीत सोने सुमारे चार टक्‍क्‍यांनी वधारले. सोन्याने 1500 डॉलर प्रति औंसवरून 1611 डॉलर प्रति औंस इतकी पातळी गाठली होती. भारतातदेखील सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी 42 हजार रुपयांवर पोचला होता. "सायकॉलॉजिकल डिमांड'मुळे निर्माण झालेली ही अस्थिरता संपून सोने-चांदीचे दर येत्या काळात स्थिर होतील, असा आशावाद पु.ना. गाडगीळ ऍण्ड सन्सचे संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक यांनी व्यक्त केला. 

क्‍लिक करा - महिलेची अशीही खोटी क्राईम स्टोरी... 
 

प्रश्‍न : सोन्याच्या भावात अचानक आलेली तेजी व अस्थिरतेमागे काय कारण? 
मोडक : "सायकॉलॉजिकल डिमांड'चा हा परिणाम म्हणता येईल. ज्या वेळी जगात कुठेही भूराजकीय वा आर्थिक अस्थिरता निर्माण होते तेव्हा गुंतवणूकदारांना सोने हा एकमेव गुंतवणुकीचा सुरक्षित आणि उत्तम पर्याय वाटतो. अशावेळी सोन्याची उपलब्धता हा मुद्दाच नसतो. तर सोन्याला मागणी येईल या अपेक्षेने सट्टेबाज प्रत्यक्ष मागणीपूर्वीच वायदेबाजारात सोन्याचे भाव चढवितात. त्यामुळे अशा स्थितीत "फिजिकल डिमांड' न वाढता "सायकॉलॉजिकल डिमांड' तयार होते. 

प्रश्‍न : यापूर्वी अशी स्थिती निर्माण झाली होती का? 
मोडक : याअगोदरदेखील 1980 मध्ये इराक- इराण युद्धाच्या वेळी सोन्याचे भाव 200 डॉलर्सनी वधारले होते. त्याचप्रमाणे अगदी अलीकडे ब्रेक्‍झिट वेळीदेखील सोन्याचे भाव 50 डॉलरने अचानक वाढले होते. मात्र नंतर त्यात "करेक्‍शन'ही झाले. अस्थिर परिस्थितीमुळे अनेक वेळा भीती निर्माण होऊन अपेक्षेपेक्षा भावात जास्त चढ- उतार होतात. 

प्रश्‍न : गुंतवणुकीसाठी सोने योग्य पर्याय आहे का? 
गुंतवणूकदारांनी तातडीने गुंतवणूक किंवा निर्गुंतवणूक करणे श्रेयस्कर नसते. सोन्यामध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे कधीही चांगले असते. भौगोलिक, आर्थिक अस्थिरेतेची कारणे, सुधारणांची माहिती नीट समजावून घेऊन त्याचे एकंदरीत काय परिणाम असतील हे लक्षात घेऊन निर्णय केल्यास अल्पकालीन नुकसान टाळून दीर्घकालीन फायदा मिळू शकतो. 

प्रश्‍न : भविष्यात या बाजारपेठेची स्थिती कशी असेल? 
भूराजकीय वा आर्थिक अस्थिरतेमुळे अनेक देशांची चलने कमकुवत होतात. त्यामुळे जगभरातील मध्यवर्ती बॅंकांना देखील चलनापेक्षा सोन्यातील गुंतवणूक शाश्वत वाटते आहे. विविध जागतिक कारणांमुळे मध्यवर्ती बॅंकांचा सोन्याकडे ओढा वाढत आहे. मध्यवर्ती बॅंकांची सोने खरेदी ही मोठ्या प्रमाणावर असल्याने प्रत्यक्ष "फिजिकल डिमांड' वाढून सोन्याच्या उपलब्धतेत अचानक घट होऊ शकते. यापुढेही मध्यवर्ती बॅंकांचे खरेदीचे सत्र असेच सुरू राहिले तर सोन्याच्या भावामध्ये असाधारण प्रकारची तेजी येऊन अल्पकाळासाठी सोने प्रति औंस 1700 डॉलरची पातळी गाठू शकते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon sakal sanvad amit modak gold rate