शहरात शाश्‍वत विकासाची पायाभरणी करणार : ऍड. शुचिता हाडा

शहरात शाश्‍वत विकासाची पायाभरणी करणार : ऍड. शुचिता हाडा

जळगाव ः शहराचा विकासकामांचा मोठा बॅकलॉग असून, तो भरण्याच्या कामाला महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर सुरवात झाली. महापालिका कर्जातून मुक्त झाल्याने आता शहरात शाश्‍वत विकासाची पायाभरणी झाली आहे. त्या माध्यमातून रस्ते, स्वच्छता, पथदिवे, आरोग्य अशा कामांना प्राधान्य देऊ, अशी ग्वाही स्थायी समितीच्या नवनिर्वाचित सभापती ऍड. शुचिता हाडा यांनी दिली. 
सभापतिपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आज "सकाळ'च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट देत संवाद साधला. वरिष्ठ बातमीदार कैलास शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शहरातील सर्वांगीण विकासावर बोलताना त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कोणत्या कामांना प्राधान्यक्रम असेल, याबाबत भूमिका मांडली. 

प्रश्‍न ः शहरातील विकासकामांचे तुमचे "व्हीजन' काय? 
ऍड. शुचिता हाडा : शहरात शाश्‍वत विकास करण्याचा माझा शंभर टक्के प्रयत्न असेल. यात मूलभूत गरजा पुरविण्यावर भर देणे, सर्व ठिकाणी पथदिवे बसविण्यासाठी आमचे व्हीजन असणार आहे. मागील सभापतींकडून त्यांच्या काळातील अपूर्ण कामांची माहिती घेऊन ते पूर्ण करणे. तसेच महापालिकेच्या दवाखान्यांची आरोग्य सेवा सुधारण्यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत. शहरात महिलांसाठी सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था करणे, हेदेखील महत्त्वाचे असून, कोणत्या योजनेतून ही कामे करता येतील, याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. महासभेत लक्षवेधी सूचना मांडून मक्तेदाराला पथदिव्यांचे काम पूर्ण करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे लवकरच हे काम सुरू होऊन जातीने लक्ष घालत ते पूर्ण करण्यात येईल. 

प्रश्‍न ः खड्डेमय रस्ते, अस्वच्छतेची समस्या कशी मार्गी लावणार? 
ऍड. हाडा : शहरात अमृत योजनेचे काम सुरू असून, अनेक रस्ते त्यामुळे खोदले गेले. मक्तेदाराने व्यवस्थित खड्डे न बुजल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. त्यात यंदा पाऊसदेखील मोठ्या प्रमाणात पडल्याने सर्व रस्त्यात पावसामुळे खड्डे पडले. आता, आठ दिवसानंतर शहरातील सर्व रस्त्यातील खड्डे बुजविणे, मक्‍तेदाराकडून खोदलेल्या चाऱ्या समप्रमाणात करून व्यवस्थित बुजविण्याचे काम केले जाईल. तसेच स्वच्छतेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून सफाईच्या काम मक्तेदाराकडून व्यवस्थित करण्यासाठी कडक पावले यासाठी उचलली जातील. 

प्रश्‍न ः महापालिका प्रशासनाच्या कामांचा वेग कसा वाढविणार? 
ऍड. हाडा : महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांची कामांची गती मंद असून, ती वाढविणे तसेच त्यांच्याकडून काम करून घेण्याची पकड वाढवावी लागणार आहे. अधिकाऱ्यांकडून सतत पाठपुरावा करून कामे करून घेणे तसेच अडचण निर्माण झाल्यास ते सोडविण्यासाठी देखील अधिकाऱ्यांना मदत घेतली जाईल. तसेच प्रशासनाच्या विविध विभागाची माहिती घेऊन जेथे आवश्‍यक वाटते त्या विभागात जाऊन कामकाजाची सुव्यवस्था लावण्याचे काम केले जाणार आहे. 

प्रश्‍न ः महिला सदस्य म्हणून सभागृहातील कामकाजावर परिणाम होतो? 
ऍड. हाडा : महापालिका सभागृहात याआधी मी विरोधीपक्षात होते. व्यवसायाने वकील असल्याने अभ्यास करून बोलण्याची सवय आहे. विरोधात असताना आणि आता आमच्या पक्षाची सत्ता असतानाही सभागृहात कुठला विषय मांडताना त्यामुळेच कोणतीही अडचण येत नाही. महापौरही महिला असून, महापालिकेत सध्या "महिलाराज' आहे. सर्वच सदस्यांनी प्रत्येक विषयाचा अभ्यास करून बोलल्यास अडचण येत नाही, हा अनुभव आहे. 

प्रश्‍न ः सभागृहात अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून तुमच्याकडे बघितले जाते? 
ऍड. हाडा : धरणगावचे माहेर असून, आई निर्मला जैन राजकारणात सक्रिय होत्या. 1885 मध्ये धरणगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्या तसेच स्थायी सभापतिपददेखील त्यांनी भूषविले होते. त्यामुळे राजकीय वारसा होता. वकिलीची प्रॅक्‍टिस करताना अमळनेरला उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांसाठी कायदा अधिकारी म्हणूनही काम केले, या अनुभवाचा आता सभागृहात फायदा होतो. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com