चिमुकल्या पाठीवर दुपटीचे ओझे! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

जळगाव ः शासनच नव्हे न्यायालयानेही दप्तराच्या ओझ्याबाबत निर्देश दिलेले असताना दप्तराचे ओझे कमी व्हायला तयार नाही. अगदी नर्सरीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे शासनाने ठरवून दिलेल्या वजनापेक्षा दुप्पट, तिप्पट आढळून आल्याचे वास्तव "सकाळ'च्या पाहणीतून समोर आले आहे. 

जळगाव ः शासनच नव्हे न्यायालयानेही दप्तराच्या ओझ्याबाबत निर्देश दिलेले असताना दप्तराचे ओझे कमी व्हायला तयार नाही. अगदी नर्सरीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे शासनाने ठरवून दिलेल्या वजनापेक्षा दुप्पट, तिप्पट आढळून आल्याचे वास्तव "सकाळ'च्या पाहणीतून समोर आले आहे. 
शाळा सुरू झाल्या की, चिमुकल्या जिवांना शाळेत जाण्यासोबत नवीन दप्तर, वह्या- पुस्तकांचे नेहमीच आकर्षण असते; परंतु प्रत्यक्षात शाळांमधून मिळणाऱ्या साहित्याच्या यादीनुसार स्कूलबॅग भरताना हे ओझे इतके जड होते, की या दप्तराच्या ओझ्याखालीच शाळेत जाणारे कोवळे जीव दबून जातात. दप्तरात नुसतेच पाठ्यपुस्तक नव्हे तर गृहपाठाच्या वह्या, सर्व विषयांची पुस्तके, पाण्याची बाटली, दुपारच्या जेवणाचा डबा हे सारे साहित्य असते. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासापेक्षा दप्तराच्या ओझेच अधिक जड होत असते. 

दुपटीचे वजन 
साधारणतः पाच ते दहा किलोपर्यंत वजनाचे दप्तर शालेय मुला-मुलींना सक्तीने दररोज शाळेत न्यावेच लागते. काही शाळांकडून विद्यार्थ्यांना शाळेत ने- आण करण्यासाठी गाडीची व्यवस्था केली असली तरी, बहुतांश खासगी शाळांतील विद्यार्थी हे रिक्षाने किंवा सायकलीने जातात. यावेळी पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन शाळेत जावे लागत असते. हेच वास्तव शहरातील प्रमुख व मोठ्या आठ शाळांमध्ये जाऊन दप्तरांचे वजन केले असता पाहावयास मिळाले. यासंदर्भात शासनस्तरावरून किंवा शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारे लक्ष दिले जात नसल्याची स्थिती आहे. 

कायदा कागदावरच 
दप्तराच्या ओझ्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना साधारणपण लहान वयातच पाठीचे दुखणे लागत असते. दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर दप्तराच्या ओझ्यासंदर्भात उठणाऱ्या प्रश्‍नावरून सरकारने दप्तराच्या वजनाबाबत कायदा लागू केला. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. या कायद्याच्या तरतुदीनुसार शालेय विद्यार्थ्यांच्या वजनाच्या दहा- पंधरा टक्के इतकेच दप्तराचे ओझ्याची कमाल मर्यादा आखून देत इयत्तेप्रमाणे दप्तराच्या वजनाचे निकष आखून दिले आहेत; परंतु हा कागदावरच राहिला आहे. कारण बहुतांश खासगी शाळांतल्या विद्यार्थ्यांना शासनाच्या निकषाच्या दुपटीच्या वजनाचे दप्तराचे ओझे पाठीवरून न्यावे लागत आहे. 

वर्ग..................वजन (निर्देशानुसार)........"सकाळ'च्या पाहणीतील वास्तव 
पहिली ते दुसरी.........1.5 किलो................4 ते 5 किलो 
तिसरी ते पाचवी........2.3 किलो................5 ते 7 किलो 
सहावी ते सातवी........4 किलो..................6 ते 8 किलो 
आठवी ते नववी........4.5 किलो...............7 ते 9 किलो 
दहावी................... 5 किलो.................7 ते 10 किलो 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon school book doubal wait