मोदी सरकारमुळे देशातील शेतकरी उद्‌ध्वस्त : शरद पवार

live photo
live photo

एरंडोल (जि. जळगाव) : शेतीमालाला भाव द्या, कर्जमुक्त करा, मुलाबाळांना सुखाने जगू द्या, एवढीच मागणी शेतकऱ्यांची मागणी होती; परंतु गेल्या पाच वर्षांच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. शेतीमालाला भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशातील शेतकरी पूर्णपणे उद्‌ध्वस्त केला आहे, असा घणाघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला. 
लोकसभेच्या जळगाव मतदारसंघाचे कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ एरंडोल येथील महात्मा फुले शाळेच्या मैदानावर आज जाहीर सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, आमदार डॉ. सतीश पाटील, उमेदवार गुलाबराव देवकर, माजी खासदार ईश्‍वरलाल जैन, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जगन सोनवणे, कॉंग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ. राधेश्‍याम चौधरी, ललिता पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील आदी उपस्थित होते. 
यावेळी श्री. पवार म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचा कर्ज माफ करू, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव देऊ, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीच नाही, तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला ते भाव देऊ शकले नाहीत. त्यामुळे या देशातील शेतकरी उद्‌ध्वस्त झाला. आघाडी सरकारच्या काळात आम्ही केवळ कर्जमाफीच केली नाही, तर शेतकऱ्यांच्या कर्जाच्या व्याजाचे दर कमी करून ते शून्यावर आणले. आमच्या काळात तांदूळ आणि गव्हाचे उत्पादन वाढले होते. भारतातून ते इतर देशाना निर्यात केले जात होते. मात्र, मोदींनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. 

"राफेल'चे पैसे कुणाच्या घशात? 
राफेल गैरव्यवहार प्रकरणीही श्री. पवार यांनी मोदींवर सडकून टीका केली. ते म्हणाले, की मोदी यांनी "न खाऊंगा, न खाणे दुंगा' अशी घोषणा केली. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून लोकांनी देश त्यांच्या हातात दिला; परंतु संरक्षणासाठी असलेल्या "राफेल' विमान खरेदीतच गैरव्यवहार केला. मनमोहनसिंग यांच्या काळात राफेल विमानाचा करार 350 कोटी होता. तो मोदींच्या काळात 1660 कोटी रुपये झाला. यात मोठ्या प्रमाणात देशाचे आर्थिक नुकसान झाले आहे. याची चौकशी करण्याची मागणी केली, तर त्यालाही त्यांनी नकार दिला. "बोफोर्स'प्रकरणी केवळ आरोप झाले, तर राजीव गांधी यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले. मात्र, त्यात काहीच निष्पन्न झाले नाही. "राफेल' प्रकरणी चौकशीस मोदी मात्र तयार नाहीत. त्यामुळे "राफेल'चा पैसा कुणाच्या घशात गेला? कोण हा चौकीदार आहे? त्याचाही शोध घेतला पाहिजे. 
 
गांधी परिवाराने विकास केला 

मोदी हे गांधी परिवारावर करीत असलेल्या हल्ल्याचाही श्री. पवार यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, की मोदी म्हणतात गांधी परिवाराने काय केले? पंडित नेहरूंनी स्वातंत्र्यानंतर देशाला विकासाची दिशा दिली. इंदिरा गांधींनी देशाला शक्तिशाली बनविले. पाकिस्तान युद्धात यश मिळवून जगात देशाची शान वाढविली. याशिवाय, बॅंकांचे राष्ट्रीयीकरण करून गरिबांसाठी बॅंका खुल्या केल्या. राजीव गांधींनी देशात विज्ञान युग आणले. त्यामुळे आज देशात मोठी क्रांती झाली आहे. मात्र, मोदींनी देशाला काय दिले, असे त्यांना विचारण्याची गरज आहे. त्यांनी केवळ मूठभर लोकांसाठी सत्ता राबविली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com