पेपर कठीण गेल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 मार्च 2020

पेपर कठीण गेल्यामुळे ती गुरुवारी दुपारपासून नैराश्‍यात होती. याबाबत तिने तिच्या आईला देखील पेपर कठीण गेला असल्याचे सांगितले. यावेळी आईने गायत्रीची समजूत काढून चिंता करू नको, असे सांगितले.

जळगाव : दहावीचा पेपर कठीण गेला म्हणून नैराश्‍यात असलेल्या गायत्री तुकाराम पाटील (वय 16) या विद्यार्थिनीने राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी 12.15 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

क्‍लिक करा -पुजेसाठी मागितला कोंबडा...यानंतर पुजाऱ्याने गमावला जीव

शिरसोली प्र. न. येथील इंदिरानगरातील रहिवासी तुकाराम जगन अस्वार हे कुटुंबीयांसोबत वास्तव्यास आहेत. ते पत्नीसोबत मोलमजुरी करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. त्यांची मोठी मुलगी गायत्री तुकाराम पाटील ही दहावीचे परीक्षा देत आहे. गायत्री हिला पेपर कठीण गेल्यामुळे ती गुरुवारी दुपारपासून नैराश्‍यात होती. याबाबत तिने तिच्या आईला देखील पेपर कठीण गेला असल्याचे सांगितले. यावेळी आईने गायत्रीची समजूत काढून चिंता करू नको, असे सांगितले.

हेपण पहा -चुलत बहिणीने फुलवले भावाच्या जीवनाचे पुष्प 

दरम्यान, आज सकाळी तुकाराम अस्वार व त्यांची पत्नी हे मोलमजुरीसाठी घरातून निघून गेले. यावेळी दुपारच्या सुमारास गायत्री हिने राहत्या घरात छताला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. तिच्या पश्‍चात आई, वडील, काका, काकू, लहान बहीण, भाऊ असा परिवार आहे. याबाबत नातेवाइकांनी मृतदेह जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला असता वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांच्या माहितीवरून एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

..अशी लक्षात आली घटना 
तुकाराम अस्वार यांचे लहान भाऊ निवृत्ती अस्वार हे त्यांच्या घराशेजारीच वास्तव्यास आहे. निवृत्ती यांच्या पत्नी सुरेखा यांनी पापड तयार करण्यासाठी गायत्री हिला बोलावले. दरम्यान, गायत्री हिने मी घरून पापड लाटण्यासाठी पोळपाट व लाटणे घेऊन येते, असे सांगून ती घरी आली. बराच वेळ झाला मात्र आपली पुतणी गायत्री ही पापड लाटण्यासाठी न आल्यामुळे त्या गायत्रीला बोलावण्यासाठी घरी गेल्या. यावेळी गायत्री हिने घरात गळफास घेतल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी आरडाओरड करताच शेजारील नागरिकांनी तत्काळ त्यांच्या घरी धाव घेत गायत्री हिचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon ssc exam paper toufe girl suicide home