कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सर्व संचालक निर्दोष सिद्ध होतील : ईश्‍वरलाल जैन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

जळगाव : राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहारप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सर्व संचालक निर्दोष सिद्ध होतील, असा विश्‍वास राज्य सहकारी बॅंकेचे माजी संचालक तथा माजी खासदार ईश्‍वरलाल जैन यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 

जळगाव : राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहारप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सर्व संचालक निर्दोष सिद्ध होतील, असा विश्‍वास राज्य सहकारी बॅंकेचे माजी संचालक तथा माजी खासदार ईश्‍वरलाल जैन यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 
राज्य सहकारी बॅंकेच्या गैरव्यवहारप्रकरणी "ईडी'तर्फे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात माजी खासदार ईश्‍वरलाल जैन यांचेही नाव आहे. याबाबत त्यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, की या प्रकरणात आपल्या बाबतीत वैयक्तिक सांगावयाचे असल्यास मी जळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेवर काही वर्ष संचालक म्हणून होतो. राज्य बॅंकेच्या काही बैठकांना माझी प्रातिनिधिक उपस्थिती असायची. या बैठकींदरम्यान सर्व बॅंकिंग कायद्याप्रमाणेच सर्व व्यवहार व प्रक्रिया राबविण्यात आल्यात. संचालक पदावर असताना मी कुठल्याही प्रकारे कोणत्याही एका पैशाला शिवलेलो नाही व कोणत्याच प्रकारचा गैरव्यवहार माझ्याकडून करण्यात आला नाही. त्याचप्रमाणे राज्य सहकारी बॅंकेकडून मिळणाऱ्या कोणत्याच सुखसुविधा, भत्ते, गाडी यांचाही कधी उपभोग घेतलेला नाही. जेव्हा एखाद्या संस्थेबाबत कायदेशीर प्रक्रिया अथवा चौकशी राबविली जाते, त्यावेळी त्या विषयाशी संबंधित बोर्ड मिटिंगला उपस्थित असलेल्या सर्व संचालकांची दखल अथवा चौकशी केली जात असते. त्याच कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग म्हणून माझेही नाव त्यात आहे. माझा न्याय प्रक्रियेवर संपूर्ण विश्‍वास असून, आपण चौकशीला पूर्ण सहकार्य करणार आहोत. 

चौकशी नसताना जबाबदारी निश्‍चित 
या प्रकरणात सहकार कायदा कलम 88 नुसार आपल्यावर 25 लाख रुपयांची जबाबदारी निश्‍चित करण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले, की आपली या प्रकरणी कोणतीही वैयक्तिक चौकशी करण्यात आलेली नाही. मात्र, कोणत्या प्रकरणात जबाबदारी निश्‍चित करण्यात आली याचीही माहिती नाही. आता न्यायालयाच्या आदेशानुसार "ईडी'ची चौकशी करण्यात येत आहे. न्यायालयाचा आदेश आपल्याला पूर्णपणे मान्य असून, आपण चौकशीस पूर्ण सहकार्य करणार आहोत. या प्रकरणात संचालकांचा कोणताही संबंध नाही. अधिकाऱ्यांकडून आलेला प्रस्ताव मंजूर करणे, हेच कार्य असते. त्यामुळे यात अधिकाऱ्यांची जबाबदारी अधिक असते. या संपूर्ण प्रकियेची चौकशी पूर्ण झाल्यावर संचालक निर्दोष होतील, असा आपल्याला पूर्ण विश्‍वास आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon state sahakar bank frod ishwarlal jain