आदेशाला हरताळ... कापूस खरेदी बंदच! 

देविदास वाणी 
गुरुवार, 23 एप्रिल 2020

सीमाबंदी असल्याने परराज्यातील व्यापारी कापूस खरेदीसाठी जिल्ह्यात येत नाहीत. जिनिंग व्यावसायिकांनी कापूस घेण्यास नकार दिला आहे. यामुळे कापूस विकावा तरी कोणाला, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. 

जळगाव ः जिल्हा प्रशासनाने कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतरही जिल्ह्यात ती अद्याप बंदच आहेत. शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल कापूस घरात पडून आहे. "कोरोनो'च्या संसर्गामुळे शेतकऱ्यांना कापूस विकण्यासाठी "सीसीआय'ची केंद्रे बंद आहेत. खासगी व्यापारी कापसाला भाव अतिशय कमी देतो आहे; तर जिल्हाबंदी असल्याने परराज्यातही कापसाची विक्री करता येत नाही, अशी स्थिती कापूस उत्पादकांची आहे. 

यंदा कापसाचे उत्पादन चांगले झाले. मात्र, दिवाळीत झालेल्या पावसाने काही कापूसही हातचा गेला. जो हाताशी लागला, तो जानेवारी- फेब्रुवारीत निघाला. शेतकऱ्यांनी कापूस काढून विकण्याची लगबग सुरू केली, तोपर्यंत मार्चमध्ये "लॉकडाउन' सुरू झाल्याने कापूस विकता आलेला नाही. हजारो क्विंटल कापूस शेतकऱ्यांकडे पडून आहे. शासनाचे "सीसीआय' खरेदी केंद्रे बंद आहेत. सीमाबंदी असल्याने परराज्यातील व्यापारी कापूस खरेदीसाठी जिल्ह्यात येत नाहीत. जिनिंग व्यावसायिकांनी कापूस घेण्यास नकार दिला आहे. यामुळे कापूस विकावा तरी कोणाला, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. 

केंद्रे सुरू करण्याबाबत कठोर आदेश द्यावेत 
किशोर चौधरी (शेतकरी, असोदा) ः जिल्ह्यात शासनाची कापूस खरेदी केंद्रे कमी आहेत. आतातर कापूस खरेदी बंद आहे. शेतकऱ्यांचा हजारो क्विंटल कापूस घरात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही केंद्रे सुरू करता येणार नाहीत, असा पवित्रा "सीसीआय'चे संचालक, व्यवस्थापक घेऊच कसे शकतात? केंद्रात विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागते. एकादिवशी पन्नास गाड्या बोलाविल्या, तरी पंचवीस गाड्यांचीच खरेदी ते करतात. घरात असलेला कापूस कोठे विकावा, हा मोठा प्रश्‍न आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तो सोडवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. 

भावातील फरक द्यावा 
मिलिंद चौधरी (शेतकरी, भादली) ः लॉकडाउनमुळे अनेक शेतकऱ्यांना कापूस विकता आलेला नाही. व्यापारी अतिशय कमी भावाने कापूस मागतात. "सीसीआय'तर्फे पाच हजार 450 रुपयांचा दर आहे. सीमाबंदी असल्याने व्यापारी परराज्यातून येत नाहीत. खरीप हंगाम तोंडावर आणि कापूस घरात आहे. कापूस विक्रीअभावी मोठी गुंतवणूक अडकून पडली आहे. शासनाने शेतकऱ्यांना कापसाच्या हमीभावातील फरक द्यावा. 

बियाण्यांसाठी निधीची अडचण 
नीलेश यशवंत पाटील (शेतकरी, वडजी) ः कापूस घरात पडून आहे. अनेक शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाली नाही. खरीप हंगाम तोंडावर उभा आहे. अशावेळी खरिपासाठी निधी कोठून आणायचा? कापूस विक्री केंद्रे सुरू झाली, तर शेतकरी कापूस विकून किमान खरिपाची तयारी करू शकेल. शासनाने अधिकाधिक संख्येने कापूस खरेदी केंद्रे सुरू करावीत. 

अंगाला "खाज' सुटण्याचे विकार 
माधवराव दगा पाटील (शेतकरी, वडजी) ः अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरातच असल्याने विशिष्ट प्रकारचे कीटक कापसावर बसतात. ते अंगावर आल्यानंतर अंगाला खाज सुटते. अंग खाज सुटण्याचे विकार अनेकांना आहे. शासनाने कापूस खरेदी केंद्रे त्वरित सुरू करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Strike on orders Stop buying cotton!